मुंबई, 6 जुलै : कलर्स टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसचा 14 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोचा या आधीचा 13 वा सीझन खूपच लोकप्रिय ठरला. एवढंच नाही तर या शोमधील कलाकारांना सुद्धा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्यानंतर आता या शोच्या 14 व्या सीझनची तयारी केली जात आहे. हा शो पुन्हा एकदा सलमान खानच होस्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा शो ऑक्टोबरमध्ये ऑनएअर होणार आहे आणि या सीझनसाठी पुन्हा एकदा सलमाननं आपल्या मानधनात वाढ केल्याचं बोललं जात आहे. सलमान खानबाबत सोशल मीडियावर असा दवा केला जात आहे की, ‘बिग बॉस 14’ च्या एका एपिसोडसाठी 16 कोटी रुपये मानधन घेणार आहे. बिग बॉस 13 च्या एका एपिसोडसाठी 12 ते 14 कोटी रुपये एवढं मानधन घेतलं होतं. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सीझनमध्ये सलमान आपलं मानधन वाढवत असतो. याशिवाय या सीझनमध्ये सुद्धा कॉमनर्सची वापसी होणार आहे. मागच्या सीझनमध्ये फक्त स्टार सेलिब्रेटींना एंट्री देण्यात आली होती. मात्र या सीझनमध्ये पुन्हा एकदा कॉमनर्सना जागा मिळणार आहे. बिग बॉस 14 साठी जास्मीन भसीन, अलीशा पंवार, आरुषि दत्ता, आकांक्षा पुरी, आंचल खुराना, साहिल खान आणि आमिर सिद्धिकी या कलाकारांना अप्रोच करण्यात आलं आहे.
टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 13 विनर ठरला होता. तर आसिम रियाज फर्स्ट रनरअप ठरला होता. सलमान खानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड हीरो’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या सोबत दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा यांच्या मुख्य भूमिका आहेत. खरं तर हा सिनेमा मे महिन्यात रिलीज होणार होता मात्र आता कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाचं प्रदर्शन लांबलं आहे. आता हा सिनेमा दिवाळीला रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे.