मुंबई 8 मार्च: नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला आकाश ठोसर (Akash Thosar) हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं सैराटमध्ये साकारलेलं परश्या हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. अकाशऐवजी त्याला आता परश्या म्हणूनच चाहते ओळखतात यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला तरी आकाशने आपले पाय मात्र जमिनीवरच ठेवले आहेत. आजही तो गावातील मित्र-मंडळींसोबत कुस्ती खेळायला जातो. दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (wrestling video) आकाशनं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. शिवाय सोबतच या अविस्मरणीय क्षणांचा अनुभव देखील त्यानं शेअर केला आहे. तो म्हणातो, “खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी…!! लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत 5 वर्ष काढली.’तालीम’ जोर,बैठका, डावपेच,शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.” अवश्य पाहा - सैराट गर्लचा हा क्युट लुक पाहिलात का? पारंपरिक बंजारा ड्रेसमधला फोटो क्षणात व्हायरल
“तालमीतलं हसतं-खेळतं वातावरण, एकाच ध्येयाने पेटून उठलेले पैलवान सवंगडी, रोज न चुकता करायचा सराव, गप्पा-गोष्टी…अशा सगळ्या आठवणी अजूनही सोबत आहेत. लाल मातीच्या स्पर्शात एक वेगळीच ताकद आणि ऊर्जा आहे.आणि त्यामुळेच मी इथपर्यंत आलो.या लाल मातीचा आणि माझ्या गुरुजनांचा, पैलवान मित्रांचा माझ्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. आणि त्याचाच उपयोग आज मला या कला क्षेत्रात होतोय.” “या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला या मातीत रुजायला, खेळायला आणि लढायला शिकवलं त्या सर्व माझ्या मातीतल्या माणसांना प्रणाम आणि धन्यवाद. खरंतर आभार, धन्यवाद हे शब्द कितीही केलं तरी तुम्हा सगळ्यांसाठी अपुरे आहेत. तरीही तुमचा सर्वांचा मी सदैव ऋणी राहील आणि मातीशी हे माझं नातं असच घट्ट राहील.” आकाशनं ‘सैराट’नंतर ‘एफ. यु. फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘लस्ट स्टोरिज’ या चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाय अलिकडेच तो ‘1965 द वॉर इन द हिल्स’ या वेब सीरिजमध्ये देखील झळकला होता. येत्या काळात तो नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे.