मुंबई 6 जून: सोनी मराठीवर (Sony marathi) आजपासून ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honar Karodpati) च्या चौथ्या सिजनला सुरवात होत आहे. ज्ञान आणि मनोरंजन यांची एकत्र सांगड असलेल्या या कार्यक्रमात येऊन तुम्ही करोडपती होऊ शकता. सोनी एंटरटेनमेंट वर केबीसी हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या आवडीचा नम्बर १ शो राहिला आहे. मराठीमध्ये या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर (Sachin Khedekar) करतात तर हिंदीत महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एक काळ गाजवला आहे. सचिन खेडेकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांचासोबतचा एक सुंदर किस्सा शेअर केला आहे. सचिन खेडेकर हे नाव आपल्याला एक अप्रतिम कलाकार म्हणून माहित आहे. या कलाकाराच्या अनेक भूमिकांचे आजही अनेक फॅन्स आहेत. सचिन खेडेकर गेले चार सीजन मराठीतील केबीसी अर्थात कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुंदर पद्धतीने करत आहेत. केवळ तुमच्या ज्ञानाच्या बळावर तुम्ही करोडपती होऊ शकता असा विश्वास देणारा एवढा लोकप्रिय शो होस्ट करताना त्यांना कसं वाटतं या संदर्भात त्यांनी बीबीसी मराठीला नुकतीच एक मुलाखत दिली. महानायक अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना आपली तुलना त्यांच्याशी होईल याचं दडपण आलेलं का याबद्दल त्यांना विचारल्यावर ते म्हणाले की, “हा अमिताभ बच्चन यांच्या नावाने ओळखला जाणारा शो आहे. त्यांनी सादर केलेला कार्यक्रम त्याच ताकदीने सादर करणं आणि तो करताना त्याची गरिमा सांभाळणं हे फार महत्त्वाचं होतं. ते करत असलेल्या अनेक गोष्टी आत्मसात करायचा मी तर म्हणेन कॉपीच करायचा मी प्रयत्न करत आलो आहे. आता साधारण तीन सिझन नंतर मला थोडं स्थिर झाल्यासारखं वाटत आहे.” सचिन खेडेकरांना खुद्द अमिताभ बच्चन याना भेटायची संधी मिळाली होती. त्याब्ब्दल ते सांगतात, ”मी त्यांच्यासोबत काही सिनेमांमधून काम केलं आहे पण मागच्या वर्षी आमचा सीजन कोविडच्या लाटेमुळे थोडासा उशिरा सुरु झाला तेव्हा आमचा आणि त्यांचा सेट बाजुबाजुलाच असल्याने एक फोटो काढता येईल अशा आशेने आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी मराठीमधील अनेक गोष्टी जाणून घेतल्या आणि कार्यक्रमाचं खूप कौतुक केलं."
“त्यांनी सांगितलं की मराठीमधील क्रोदप्तीचा हा कार्यक्रम त्यांनी पहिला आहे. मी प्रश्न विचारताना हातची एक विशिष्ट हालचाल करतो ती त्यांनी कॉपी केली आहे असं खुद्द अमिताभ बच्चन यांनी मला आर्वजून सांगितलं.” सचिन खेडेकर यांना प्रेक्षकांनी सुद्धा सूत्रसंचालकच्या भूमिकेत खूप चांगलं स्वीकारलं आहे. त्यांचा हा नवा सीजन काय नव्या गोष्टी घेऊन येणार हे पाहण्यासारखं असेल.