बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्तासंदर्भात (Rupa Dutta Arrested) धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशोभनीय वर्तनाबद्दल तिला अटक झाली आहे. असे वृत्त समोर आले आहे की, पाकिटमारी केल्याच्या आरोपात अभिनेत्री रुपा दत्ताला अटक करण्यात आली आहे. दरम्यान याआधी रुपा दत्ता प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर आरोप केल्यामुळे चर्चेत आली होती
मीडिया अहवालानुसार, अभिनेत्री 2020 मध्ये चर्चेत आली होती. तिने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर असभ्य मेसेज पाठवण्याचा आरोप केला होता.
तिने दिग्दर्शन अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आणि ड्रग सप्लाय करण्याचे आरोप केले होते. रुपा दत्ता नावाच्या अनव्हेरिफाइड ट्विटर अकाउंटवर आजही ते ट्वीट आहे, ज्यावर तिने काही स्क्रीनशॉट शेअर करत हे आरोप केले होते.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार तिने अनुराग कश्यपवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. पण चौकशीअंती हे आढळून आलं होतं की तिला असभ्य मेसेज पाठवणारी अनुराग नावाची भलतीच कुणीतरी व्यक्ती आहे.
या अभिनेत्रीबाबत सोशल मीडियावर फारसे अपडेट उपलब्ध नाही आहेत. तिचे इन्स्टाग्रामही प्रायव्हेट आहे. इन्स्टावरील बायोनुसार तिने 'जय मां वैष्णो देवी' या मालिकेत माता वैष्णो देवीचे काम केले आहे.
मीडिया अहवालानुसार, तिच्या सोशल मीडियावर उपलब्ध डेटाच्या आधारांवर या अभिनेत्रीने वयाच्या दहाव्या वर्षापासून काम सुरू केले होते. तिने शूल फाउंडेशन नावाची संस्था सुरू केली असून महिला सबलीकरणासाठी ती काम करते, अशीही माहिती मिळते आहे.
दरम्यान ज्यामुळे रुपा दत्ता आज चर्चेत आली ती पाकिटमारीची घटना कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यादरम्यान घडली आहे. मीडिया अहवालांनुसार, अभिनेत्रीकडे चोरी केलेले 75000 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या मेळाव्यामध्ये काही पोलीस ड्युटीवर तैनात होते, त्यावेळी त्यांनी एका महिलेला डस्टबिनमध्ये एक बॅग फेकताना पाहिले. चौकशी केल्यानंतर तिच्याकडून योग्य उत्तरं न मिळाल्याने पोलिसांनी तिच्या बॅगेची झडती घेतली. त्यामध्ये त्यांना 75000 रुपये आढळून आले. या महिलेला विधानगर नॉर्थ पोलीस ठाण्यात आणण्यात आलं, तेव्हा चौकशीअंती हे लक्षात आलं की ही महिला दुसरी तिसरी कुणी नसून प्रसिद्ध अभिनेत्री रुपा दत्ता आहे. तिने केलेल्या गुन्ह्याची अभिनेत्रीने कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.