मुंबई, 6 सप्टेंबर : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयसह NCB ही तपास करीत आहे. या प्रकरणात नारकोटिक कंट्रोल ब्युरोच्या हातात अनेक महत्त्वपूर्ण पुरावे लागल्याचे सांगितले जात आहे. त्यातच रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक याला आणि सॅम्युअल यांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज प्रकरणात काही महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याने यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. 6 सप्टेंबर रोजी रियालाही या प्रकरणात हजर राहावे लागणार आहे.
या सर्व प्रकारामुळे रियाच्या वडिलांना जबरदस्त धक्का बसला असून त्यांनी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या नावाचा एक संदेश व्हायरल झाला आहे. यात लिहिलं आहे -
अभिनंदन इंडिया...तुमच्यामुळे माझ्या मुलाला अटक झाली..नक्कीच या रांगेत पुढचा नंबर माझ्या मुलीचा असेल..त्यानंतर माहीत नाही आणखी कोण कोण असेल...तुम्ही परिमाणकारकपणे एक मध्यमवर्गीय कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे..मात्र न्यायासाठी सर्व योग्य आहे..जय हिंद ! या संदेशाखाली लेफ्टनंट कर्नल इंद्रजीत चक्रवर्ती आणि कंसात निवृत्त असं लिहिलं आहे.
सोशल मीडियावर हा संदेश अनेकांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी शौविकचा एक व्हॉट्सअॅप स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता. यामध्ये ड्रग्जच्या खरेदीसंदर्भातील संवाद होता. त्यानंतर शोविक चक्रवर्तीला अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा कलम 20 ( ब ), कलम 28, कलम 29 आणि कलम 27 ( अ ) या कलमांतर्गत 4 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. शोविकसोबतच सुशांत सिंग राजपूतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा याला देखील याच कलमा खाली अटक करण्यात आली.
बसित, जैद, शोविक आणि सॅम्युल मिरांडा यांची समोरा समोर बसून चौकशी केली असता शोविकच्या सांगण्यावरून बसितने जैदकडून अंमली पदार्थ आणले, तर जैदकडून शोविकने अंमली पदार्थ घेतले, असं समोर आलं आहे. 'शोविक अंमली पदार्थ घेऊन सॅम्युलकडे गेला आणि शोविकच्या सांगण्यावरून अंमली पदार्थांचे पैसे दिले', असं सॅम्युएल मिरांडाने कबूल केलं आहे. हे अंमली पदार्थ सॅम्युलने सुशांत सिंग राजपूतला दिले अशी कबूलीही या सर्वांनी दिली आहे. त्यामुळे एनसीबीने शोविक आणि सॅम्युल मिरांडा यांना अटक केली.