मुंबई, 13 जानेवारी- मराठी मालिका सध्या फारच लोकप्रिय होत आहेत. मालिकांचे वेगवेगळे विषय आणि कलाकारांचा सहजसोपा अभिनय यामुळे प्रेक्षक मालिकांकडे पुन्हा एकदा आकर्षित होत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यामुळेच मालिकेचे एक दोन नव्हे तर तब्बल तीन भाग आपल्या भेटीला आले आहेत. सध्या मालिकेचा तिसरा भाग सुरु आहे. मालिकेत प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्कृष्ट वठवली आहे. यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता वाड्ये (Prajakta wadaye) होय. प्राजक्ताने मालिकेत सरिताची (Sarita) भूमिका साकारली आहे. झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले ही मालिका तुफान गाजली. सर्वप्रथम २०१६ मध्ये ही मालिका पहिल्यांदा आपल्या भेटीला आली होती. या मालिकेतील सस्पेन्स आणि थ्रीलने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. अल्पावधीतच मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. प्रचंड यशानंतर मालिकेने पुन्हा दोन भाग आणले. त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात दत्ताची बायको असणाऱ्या सरिताची भूमिका चांगलीच भाव खाऊन गेली होती. सरिताच्या अभिनयाचंदेखील फार कौतुक झालं होतं. ही भूमिका नवखी अभिनेत्री प्राजक्ता वाड्येनं साकारली आहे.
मालिकेच्या पहिल्या भागात सरिता अत्यंत सोशिक, नम्र, दयाळु इतरांची काळजी घेणारी सून होती. परंतु आयुष्यात घडत गेलेल्या घटना आणि तिच्या आयुष्यात झालेले विचित्र बदल यामुळे ती फारच बदलली. सध्या तिसऱ्या भागातील सरिता ही अतिशय फटकळ, स्वार्थी, ओंघळवाणी आणि सतत किटकिट करणारी अशी आहे. परिस्थिती एखाद्या व्यक्तीला कितपत बदलू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सरिता. (हे वाचा: VIDEO:’..अन् मी थेट तलावात’ वीणा जगतापने सांगितला काश्मीर ट्रीपचा भन्नाट किस्सा ) सरिता आणि प्राजक्तामध्ये काय साम्य?- अभिनेत्री प्राजक्ता वाड्येनं एका मुलाखती दरम्यान या भूमिकेत आणि आपल्यात काही साम्य आहे का? याबद्दल सांगितलं होतं. यावेळी बोलताना प्राजक्ता म्हणाली, ‘सरिता आणि प्राजक्ता एकमेकींच्या फारच विरुद्ध आहेत. मी खऱ्या आयुष्यात अन्याय सहन करणं, चुकीच्या वागणुकीला विरोध न करणं, सोशिक बनून वावरणं या विरोधात आहे. मला त्या सरिता पेक्षा आत्ताची तडकाफडकी बोलणारी सरिताच जास्त भावते’.