मुंबई, 06 मार्च : आजकाल हमखास मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी कलाकारांना बोलावलं जातं. मराठी कार्यक्रमांची शोभा वाढवण्यासाठी हे कलाकार मराठी कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. अनेक वेळा या कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स परफॉर्मन्स देखील सादर केले जातात शिवाय हे कलाकार देखील मराठी गाण्यांवर थिरकताना दिसतात. आता येणाऱ्या काळात विविध पुरस्कार सोहळे पार पडणार असून नुकतंच झी गौरवची घोषणा झाली आहे. झी गौरव हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक सन्मानाचा पुरस्कार सोहळा आहे. आता झी गौरवच्या मंचावर साऊथची सुंदरी आणि भारतातील तरुणांची नॅशनल क्रश रश्मीका मंदाना येणार आहे. नुकताच त्याबद्दल एक व्हिडीओ समोर आला आहे. रश्मीका मंदाना साऊथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागच्या वर्षात आलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारत सगळ्यांनाच वेड लावले होते. आता ‘पुष्पा’ च्या पुढच्या भागात देखील ती दिसणार आहे. एवढंच नाही तर रश्मीकाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटात ती बिग बींच्या सोबत ‘गुडबाय’ या सिनेमात झळकली होती. तर नुकतीच ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ‘मिशन मजनू’ मध्ये देखील दिसली होती. आता ही रश्मीका लवकरच झी गौरवच्या पुरस्कार सोहळ्यात सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Aai Kuthe Kay Karte: ‘आता परत येऊ नकोस…’ अरुंधतीच्या लग्नाच्या मुहूर्तावर बरळला अनिरुद्ध; कांचनही संतापली झी मराठीने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये रश्मीकाला या सोहळ्याचं आमंत्रण मिळालेलं दिसत आहे. ती म्हणते, ‘नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी श्रीवल्ली मी येतेय मराठी लावणीवर ठुमका लावायला झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात’. रश्मीका या सोहळ्यात लावणीवर नृत्य करणार असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे अनेक प्रेक्षक तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक झालेले दिसतायत.
पण रश्मीका मंदानाला मराठी कार्यक्रमांत बोलावणं हे काही प्रेक्षकांना पटलेलं दिसत नाहीये. त्यांनी या पोस्टवर कमेंट करत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टवर कमेंट करत एका प्रेक्षकाने म्हटलंय कि, ‘तुम्हाला मराठी गाणी आणि महाराष्ट्रातील नृत्यप्रकार दिसत नव्हतेच, आत्ता तर मराठी चित्रपट सृष्टी गाजवलेले कलाकार भेटत नाही… किती दुष्काळ पडला आहे महाराष्ट्रात कलाकारांचा…’ तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने ‘एक व्हिडिओ होता त्यात हिला कोणी विचारलं… कस वाटल मुंबई, तर हिने काय उत्तर द्यावं, केम छो मुंबई! जिला मराठी चा म माहीत नाही, मुंबईत येऊन सुद्धा, तिलाच बोलवा…. कोणी उरले च नाही का खरे कलाकार फिल्म इंडस्ट्री मध्ये!’ अशी कमेंट करत खंत व्यक्त केली आहे.
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा 26 मार्च, रविवार रोजी संध्या. 7 वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रश्मीका सोबतच मराठीतील दिग्गज कलाकार देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे यावेळी या पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.