मुंबई, 09 नोव्हेंबर : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना तिचे चित्रपट तसेच त्यातील जबरदस्त अभिनयासाठी देशभरात खूप प्रसिद्ध आहे. नॅशनल क्रश म्हटली जाणारी ही अभिनेत्री अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री विजय देवरकोंडा आपल्या रिलेशनशिपमुळे खूप चर्चेत आहे. मात्र, या दोन्ही कलाकारांपैकी कोणीही याबाबत उघडपणे बोललेले नाही. नुकतेच रश्मीकाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच येणाऱ्या काळात ती ‘मिशन मजनु’ आणि ‘अॅनिमल’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही झळणार आहे. पण सध्या ही अभिनेत्री वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. रश्मिकाने नुकतच एक भलीमोठी पोस्ट लिहीत तिला केलं जाणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सांगितलं आहे. नुकताच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रश्मिकाने ट्रोलिंगचा अनुभव सांगितला आहे. या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “गेले काही दिवस, आठवडे, महिने किंवा वर्षांपासून मला काही गोष्टी त्रास देत आहेत. या गोष्टींवर लक्ष देण्याचे मी आज ठरवले आहे. ज्याबद्दल मी खूप आधी बोलायला हवं होतं, त्यावर मी आज व्यक्त होणार आहे.” हेही वाचा - आधी स्वतःशीच लग्न आणि आता प्रेग्नेंट आहे ‘ही’ अभिनेत्री? पोस्ट शेअर करत म्हणाली… अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे कि, ‘‘जेव्हापासून मी माझ्या करिअरला सुरूवात केली तेव्हापासून मला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. ट्रोलर्ससाठी मी पंचिंग बॅग बनले आहे. मी ज्या क्षेत्रात कार्यरत आहे त्यासाठी खूप काही गमवावं लागणार आहे हे मला आधीपासूनच ठाऊक होते. मी सर्वांना आवडेन असे नाही आणि मी कोणाकडून तशी अपेक्षाही करत नाही. पण कारण नसताना तुम्ही माझ्याबद्दल द्वेष पसरवू शकत नाही. जेव्हा इंटरनेटवर मला विनाकारण ट्रोल केलं जातं, तेव्हा त्याचा मला खूप मनस्ताप होतो.’’
ती पुढे म्हणाली, ‘‘माझ्या मुलाखतींचा, बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. खोट्या अफवा पसरवल्या जातात. याने मला आणि माझ्या जवळच्यांना खूप त्रास होतो. मी चुकत असेनही, चुका सुधारायची माझी तयारी आहे. पण द्वेष पसरवणं वाईट आहे. खूप वर्षांपासून दुर्लक्ष केलेल्या या मुद्द्यावर व्यक्त व्हायचे मी आज ठरवले”, असे म्हणत तिने ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे. या प्रवासामध्ये मिळालेल्या प्रेमाबद्दल तिने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
रश्मिका आज मोकळेपणाने बोलली आहे. तिच्यासारखा ट्रोलिंगचा सामना चित्रपटसृष्टीत प्रत्येकला करावा लागतो. पण कोणी याविषयी जास्त बोलत नाही. रश्मीकाने याविषयी पोस्ट लिहीत आवाज उठवला आहे. तिच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत तिला पाठींबा देत आहेत.