रणवीर सिंगने महेश बाबूला म्हटलं 'मोठा भाऊ', वाचा ट्विटरवर का ट्रेंड होतोय एकत्र PHOTO
रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि महेश बाबूचा (Mahesh Babu) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते दोघंही अत्यंत रफटफ वेशात असून, साहसी कामगिरीला शोभेल असा त्यांचा लूक आहे. र
मुंबई, 26 डिसेंबर: सध्या सोशल मीडियावर (Social Media) सर्वाधिक ट्रेंड होत आहे तो बॉलिवूड (Bollywood) स्टार रणवीर सिंग (Ranveer Singh ) आणि दाक्षिणात्य (Tollywood) चित्रपटसृष्टीतील स्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांचा एकत्रित फोटो. या फोटोचीच सर्वत्र जोरदार चर्चा असून, सोशल मीडियावर रणवीर सिंग आणि महेश बाबू सर्वाधिक ट्रेंड होत आहेत. गप्पा मारण्यात गुंगून गेलेल्या या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या दोन्ही हिरोंच्या लाखो चाहत्यांनी या जोडीचं स्वागत केलं असून, कमेंटस आणि इमोजींचा वर्षाव केला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं या दोघांच्या फोटो ट्रेंडची माहिती दिली आहे.
हे दोन्ही आपापल्या फिल्म इंडस्ट्रीतले अतिशय लोकप्रिय कलाकार असून दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी आपले नवनवीन फोटो, व्हीडिओ, बातम्या टाकत असतात. हे दोघेही थम्स अपचे (Thums Up) ब्रँड अॅम्बॅसेडर असून, प्रथमच या ब्रँडच्या जाहिरातीनिमित्त स्क्रीनवर एकत्र आले आहेत. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील हे दोन दिग्गज कलाकार थम्स अपच्या जाहिरातीसाठी एकत्र आले असून, त्या जाहिरातपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. दोघेही अत्यंत रफटफ वेशात असून, साहसी कामगिरीला शोभेल असा त्यांचा लूक आहे. रणवीर सिंग यानं या फोटोसह या शूट दरम्यानचे अन्य काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघांचा फोटो शेअर करताना रणवीर सिंगनं महेशबाबू याचं कौतुक केलं आहे. ‘एका अत्यंत उमद्या व्यक्तिमत्वाच्या कलाकाराबरोबर मी काम करत आहे, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आमच्या दोघांच्या गप्पा नेहमीच रंगतात. लव्ह अँड रिस्पेक्ट बिग ब्रदर महेश' असं त्यानं या फोटोसोबत लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर महेश बाबू यानंही उत्तर दिलं असून, रणवीरबाबत आपल्या भावना अशाच असून, त्याच्याबरोबर काम करणं हा अतिशय उत्तम अनुभव होता, असं म्हटलं आहे.
चाहत्यांनाही या दोन लोकप्रिय कलाकारांनी एकत्र येणं आवडलं आहे. हे दोन्ही हिरो सध्या नवीन चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. रणवीर सिंग रोहित शेट्टीचा सर्कस, करण जोहरचा तख्त तसंच जयेशभाई जोरदार या चित्रपटात काम करत आहे. क्रिकेटपटू कपिलदेव याच्या आयुष्यावर बेतलेल्या 83 या चित्रपटात रणवीर सिंगनं कपिलदेवची भूमिका साकारली असून, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तर महेशबाबू एस.एस.राजामौली आणि परसुराम यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटांमधून रसिकांच्या भेटीला येणार आहे.