मुंबई, 9 फेब्रुवारी: नामवंत चित्रकर्ते राज कपूर यांचे सगळ्यात धाकटे सुपुत्र आणि बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर यांचं निधन (Rajiv kapoor no more) झालं आहे. ते 58 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांची प्राणज्योत मालवली. राज कपूर यांनी राजीव कपूरना लाँच करण्यासाठी मोठ्या दिमाखात राम तेरी गंगा मैलीची (Ram teri ganga maili) घोषणा केली. या सिनेमाने रातोरात स्टार झालेल्या राजीव कपूर यांना नंतर मात्र फार मोठी लोकप्रियता वाट्याला आली नाही. किंबहुना पहिल्या सिनेमातसुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक चर्चा झाली त्यांच्या हिरोइनचीच आणि तेही तिच्या बोल्ड आणि बिनधास्त सीन्समुळे. राजीव हे ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे लहान भाऊ. आपल्या भावांप्रमाणेच ते देखील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जायचे. 1983 साली ‘एक जान है हम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘नाग नागीन’, ‘जलजला’, ‘जबरदस्त’, ‘मेरे साथी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 1985 साली प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळं ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील एक सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटात त्यांनी नरेंद्र ही भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री मंदाकिनी त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. अनेक चित्रपट समीक्षकांच्या मते हा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट तत्कालीन बॉलिवूडपटांची चौकट मोडणारा ठरला. शिवाय ‘मंदाकिनी’ची काही दृश्य त्या काळात खूपच वादग्रस्त ठरली. तिने दिलेल्या काही दृश्यांवर त्यावेळी जोरदार टीका देखील करण्यात आली होती. राम तेरी गंगा मैली हा 80 दशकातील हा एक वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय चित्रपट होता. या चित्रपटामुळं राजीव यांना त्यांच्या भावंडांप्रमाणेच तत्कालीन सुपरस्टार कलाकारांच्या पंक्तीत स्थान मिळालं असं म्हटलं जातं.
He was a pure heart and a very nice human being. May his soul rest in peace, deepest condolences to the family 🙏#rajivkapoor #riprajivkapoor pic.twitter.com/GRVxPE0TLW
— Naved Jafri (@NavedJafri_BOO) February 9, 2021
राजीव कपूर यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. नीतू कपूर, रीधीमा कपूर, नावेद जाफरी, पायल घोष, दिव्या दत्ता, तुषार कपूर यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.