मुंबई, 05 जुलै : आरआरआर फेम अभिनेता राम चरण सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राम चरणच्या घरी लेकीचं आगमन झालं आहे. कोनिडेला कुटुंब अत्यंत खुश असताना दुसरीकडे त्यांच्या घरातील लेकीचं लग्न मोडलं आहे. राम चरणची बहिण निहारिका कोनिडेला आणि तिच्या नवरा चैतन्य जोंनालागद्दा यांनी घटस्फोट घेतला आहे. निहारिका ही रामचरणची चुलत बहिण आहे. निहारिकानं सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहित तिच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. वैचारिक मतभेदांमुळे निहारिका आणि चैतन्य यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. निहारिका आणि चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील अनेक दिवस सुरू होत्या. मात्र त्यांवर दोघांनीही उत्तर देणं टाळलं होतं. दरम्यान राम चरणला मुलगी झाल्यानंतर चर्चा थांबल्या असं वाटतं होतं. तितक्यात निहारिका आणि चैतन्य यांनी स्वत:हून त्यांच्या घटस्फोटाची माहिती देत चर्चांना पुर्णविराम दिलाय. दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. मात्र नात्यात खटके उडू लागल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे सगळे फोटो डिलीट केले आहे. हेही वाचा - Bald Look: एक भूमिका अन् काळेभोर केस कापून कलाकारांवर आली टक्कल करण्याची वेळ
निहारिका ही निर्माते आणि अभिनेते नागा बाबू यांची मुलगी आहे. काही दिवसांआधीच निहारिकाचा भाऊ तेज आणि लावण्या यांचं लग्न झालं. त्या लग्नात चैतन्य कुठेच न दिसल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. निहारिका आणि चैतन्य यांनी 2020मध्ये लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडला होता. अल्लू अर्जुन, स्नेहा रेड्डी सह अनेक कलाकार आणि मित्र परिवार तिच्या लग्नाला आला होता.
निहारिकाने पोस्ट लिहित म्हटलं आहे की, “चैतन्य आणि मी परस्पर सामंजस्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे जाण्यासाठी आम्हाला दयाळूपणा आणि संवेदनशीलता हवी आहे. आमच्यासाठी आधार स्तंभ असलेल्या माझ्या कुटुंबाचे, मित्रांचे मी आभार मानते. मी आमच्या प्रायव्हसीची अपेक्षा करते. या नवीन गोष्टीला खाजगी ठेवा. आम्हाला समजून घेण्यासाठी सर्वांचे आभार”. दोघांनी हैद्राबाद कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली असून दोघे आता आपापल्या आयुष्यात वेगळे झालेत.