मुंबई, 06 नोव्हेंबर : आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात प्रशांत दामलेंच्या नाटकाचा 12,500 वा प्रयोग पार पडला. या प्रयोगासाठी खास मुख्यंमत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशांत दामले यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. राज ठाकरे यांनी आपल्या छोटेखाणी भाषणात चौफेर फटकेबाजी केलेली पाहायला मिळाले. काय म्हणाले राज ठाकरे? निवडणुकीनंतर लोकं जे बोलतात ते आज आम्ही बोलणार आहोत. आमच्या हाती काय आली तर.. घंटा! या वाक्याने सुरुवात करताच सभागृहात हशा पिकला. आमचीही नाटकं तुम्हाला चांगली वाटतात. हे तुमच्या उपस्थितीवरुन आम्हाला जाणवतंय. प्रशांत दामले यांनी आज 12 हजार 500 प्रयोग करुन विश्वविक्रम केला आहे. हा विक्रम करणे सोप्प नाही. इतके प्रयोग म्हणजे विचार करा त्यांनी किती तास स्टेजवर घालवला आहे. इतकी वर्ष एका व्यक्तीने कुतूहल सांभाळणं ही सोपी गोष्टी नाहीय. मराठी माणूस पहिल्यापासून नाटकवेडा राहिला आहे. त्याचा ओढा चित्रपटापेक्षा नाटकाकडेच राहिला आहे. आपल्या देशातील रंगभूमीवरील कलाकार, चित्रपटातील लोक, लेखक, साहित्य, चित्रकार अशी कलाकार मंडळी जन्मला नसती तर काय झालं असतं? आपण या लोकांच्या कलेत गुंतून पडलो, म्हणून वाईट वळणाला गेलो नाही.
प्रशांत दामले यांच्यासारखा कलाकार युरोपमध्ये जन्माला आला असता तर या व्यासपीठावर देशाचा पंतप्रधान उपस्थित असते. या व्यासपीठावर मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला येऊ का नको असं वाटत होतं. मात्र, प्रशांतच्या कार्यक्रमाला यायचं होतं. नाहीतर लोकांना उगाच वाटायचं की एकावर एक फ्री मिळतोय का? आपल्या देशात एकही विमानतळ नाही, ज्याला कलाकाराचं नाव आहे. आपल्याकडे कलाकारांचं महत्त्व कमी आहे. इथं कलाकारांची नावे चौकांना दिली जाते. अभ्यासक्रमात देखील कलाकारांचा जास्त समावेश दिसणार नाही. पण, यापेक्षाही सर्वात मोठा आर्शीवाद या कलाकारांना प्रेक्षकांचा आहे. तुमच्या मनात या कलाकारांनी जागा केली आहे. कलाकारांचा मान राखला पाहिजे. प्रशांत दामले पूर्वी बीएसटीमध्ये होते. मात्र, त्यांनी रंगभूमीचं तिकीट काढलं म्हणून ते वाचले, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केलं. वाचा - Prashant Damle: 12,500 व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामलेंना खास भेट; अभिनेत्याची पद्म पुरस्कारासाठी शिफारस प्रशांत दामलेंकडून आठवणींना उजाळा प्रशांत दामलेंना या प्रवासात अनेक चढउतार पाहायला मिळाले. एवढ्या वर्षांचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आता रंगभूमी वरील त्यांच्या 12,500 व्या प्रयोगानिमित्त त्यांनी या कडू गोड आठवणींना उजाळा दिला आहे. या प्रवासाविषयी त्यांनी जुन्या आठवणी सांगत लिहिलं आहे कि, ’ येत्या काही दिवसांतल्या माझ्या 12,500 व्या प्रयोगाचं! लोक मला विचारतात, ‘या टप्प्यावर मागे वळून बघताना कसं वाटतंय..?’ वगैरे वगैरे. पण खरं सांगतो, हे एवढे प्रयोग कधी, कसे झाले, मला कळलंच नाही. मला नाटक करायचं आहे, लोकांना नाटक दाखवायचं आहे एवढंच मला कळत होतं. तसा ‘नाटकवाला’ होण्याला घरून विरोधच होता. तेव्हा संगीत नाटकांचा भर ओसरत चालला होता. त्यामुळे ‘आता नाटकाचं कसं होणार?’ ही चर्चाही सुरू झाली होती. पण तुम्हाला म्हणून सांगतो- ही चर्चा सतत होतच असते. परंतु नाटक आजवर काही थांबलेलं नाही. काळानुसार फक्त ते बदलत गेलं. आणि हे जो जाणून असतो, तो खरा नाटकवाला!’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या.