मुंबई, 20 जानेवारी: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. टॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत सर्वत्र पुष्पा सिनेमाची चर्चा सुरू आहे. साऊथसह हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, या चित्रपटाचा आता मराठमोळं व्हर्जन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर आपल्या भन्नाट क्रिएटीव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘खास रे’ या युट्यूब चॅनेलवरुन पुष्पाचा मराठी ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हिंदी, इंग्रजी गाण्यांच्या चालीवर भन्नाट मराठी गाणी तयार करणाऱ्या टीमने अल्लू अर्जुनच्या या धमाकेदार अॅक्शन मुव्हीला मराठमोळा तडका दिला आहे. आणि व्हिडीओच्या अखेरी बनवा मग रील्स असे चाहत्यांना आवाहन केले आहे.
‘खास रे’ या युट्यूब चॅनेलने चित्रपटातील काही भाग हायलाईट्स करत त्यातील डायलॉगबाजी मराठी भाषेत डब केली आहे. ‘जर तुमच्या हातात बंदुकी हायत तर आमच्या हातात बी कुऱ्हाडी हायत. वेळ आल्यावर गुच्चा बसणारच,’ तर “पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या…” या डायलॉगचा मराठी व्हर्जनमध्ये ‘पुष्पा नाव ऐकून गुलाबाच फुल वाटलो काय बॉम्ब हाय मी’ अशा भन्नाट शब्दात क्रिएट करण्यात आला आहे. व्हिडीओ काल म्हणजेच बुधवारी 19 जानेवारीला युट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आला असून काही तासांमध्ये त्याला २० हजारांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्स बॉक्समध्ये अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. पुष्पा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 14 जानेवारी रोजी हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. तर 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. ‘पुष्पा: द राइज’ हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.