मुंबई, 15 जुलै: मराठी सिनेसृष्टीत सध्या एकाहून एक जबरदस्त चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातील एक चित्रपट म्हणजे ‘तमाशा लाईव्ह’. संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेली अनेक दिवस या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमात मराठीतील तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही तडफदार पत्रकारांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमाची चर्चा आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येताच प्रेक्षाकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक कलाकारांनीही सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये हजेरी लावली आहे. अनेक प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत. अशातच रानबाजार फेम अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सिनेमा पाहिल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि समाजात काय सुरू असतं याचं तिला भान असतं. रानबाजार सारख्या सिनेमाच्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांवर तिची नवी छाप सोडली. तमाशा लाईव्ह पाहिल्यानंतर प्राजक्तानं तिची प्रतिक्रिया देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्तानं तमाशा लाईव्ह सिनेमाचं पोस्टर इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत सिनेमाचं तोंडभरु कौतुक केलं आहे. हेही वाचा - Bhagya dile tu mala: कावेरीने राजला नेसवली साडी! ‘भाग्य दिले तू मला’ च्या सेटवर कलाकारांची धमाल प्राजक्तानं म्हटलंय, ‘तमाशा लाईव्ह हा सिनेमा पाहिल्यावर तुमचा बातम्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल. बातम्यांमागील सत्यासाठी हा सिनेमा नक्की बघा’. प्राजक्ताच्या या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याचप्रमाणे प्राजक्तानं सिनेमाच्या संपूर्ण टीमचं देखील कौतुक केलं आहे. दिग्दर्शक संजय जाधव, उमेश जाधव, क्षितीज पटवर्धन, अमितराज, पंकज पडघन, अभिनेता सचित पाटील, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी या सगळ्यांना ‘एक्सलेंट वर्क’, असं म्हणत त्यांच्या कामाची पोचपावती दिली आहे.
तमाशा लाईव्ह या सिनेमात प्रेक्षकांना सांगितिक मेजवानी मिळणार आहे. सिनेमात अनेक दमदार गाणी आहेत. प्रत्येक गाण्याचा प्रकार वेगळा आहे. प्रत्येक गाण्याबरोबर सिनेमाचं कथानक पुढे सरकतं. संगीतातील सगळे प्रकार एकाच सिनेमात वापरल्याचा हा पहिलाच प्रकार दिग्दर्शक संजय जाधव यांनी केला आहे. गरमा गरम, वाघ आला, रंग लागला या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूल घातला आहे. सिनेमा देखील प्रेक्षकांना आवडेल यात काही शंका नाही.