मुंबई 19 एप्रिल: छोट्या पडद्यानंतर मोठा पडदाही गाजवणारी अभिनेत्री प्राची देसाई(Prachi Desai)हिनं आपणही कास्टिंग काउचची(Casting Couch)शिकार ठरलो असून,एका मोठ्या दिग्दर्शकानं(Director)बड्या चित्रपटात काम देण्यासाठी शरीर सुखाची (Sexual favors)मागणी केल्याचा आरोप केला आहे. यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ माजली असून, पुन्हा एकदा बॉलीवूड (Bollywood)आणि अभिनेत्रींचे लैंगिक शोषण या विषयाला तोंड फुटलं आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत तिनं हा खुलासा केला आहे. आपल्यालाही कास्टिंग काउचला सामोरं जावं लागलं असून,एका मोठ्या चित्रपटात काम देण्यासाठी एका दिग्दर्शकानं तिला तडजोडकरण्यास सांगितलं होतं; मात्र त्याला स्पष्ट नकार दिल्याचं प्राचीनं सांगितलं. कसल्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसल्याचं स्पष्टपणे बजावून देखील तो दिग्दर्शक सतत संपर्क करत होता; पण शेवटपर्यंत नकारावर ठाम राहिल्यानं अखेर त्यानं माघार घेतली,असं प्राची देसाई हिनं स्पष्ट केलं.
‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा
प्राची अतिशय कमी चित्रपटांमध्ये दिसते याबाबत विचारलं असता, ती म्हणाली की, काम मिळवण्याचं दडपण माझ्यावर कधीच नव्हतं. प्रसिद्धी झोतात राहण्याची मला हौस नाही. त्यामुळे मी मला आवडेल त्याच भूमिका करण्यावर भर देते. त्यामुळे सुरवातीच्या काळात मला अनेक ऑफर्स आल्या तरी मी त्यातील फार कमी स्वीकारल्या. अनेक बड्या दिग्दर्शकाबरोबर चांगल्या चित्रपटांमध्ये मी काम केलं; पण ज्या भूमिका माझ्या करियरमध्ये फार मोलाची भर घालू शकत नाहीत, असं वाटलं त्या सगळ्या मी नाकारल्या. आजही मी अगदी निवडक भूमिका करण्यावर भर देते. मला काय हवं आहे याबाबत मी ठाम आहे. त्यामुळे मी सतत पडद्यावर दिसत नाही.
प्राची देसाई हिनं 2006 मध्ये छोट्या पडद्यावरील‘कसम से’ या मालिकेतून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं होतं. यामध्ये तिनं राम कपूरबरोबर काम केलं होतं. यातील तिच्या कामाची चांगली प्रशंसा झाली. त्यानंतर तिनं आणखीही काही मालिकांमधून आपला ठसा उमटवला. यामुळे बॉलीवूडची दारंही तिच्यासाठी लवकरच खुली झाली आणि तिनं ‘रॉक ऑन’(Rock On)या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई,बोल बच्चन आणि अझहर अशा विविध चित्रपटांमधून काम केलं. अलीकडेच ती ‘झी फाईव्ह’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या देवहंस भरूचा दिग्दर्शित ‘सायलेन्स : कॅन यु हिअर इट’ या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. यामध्ये मनोज बाजपेयी,अर्जुन माथूर आणि साहिल वैद्य यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Bollywood actress, Entertainment, Photography, Prachi dessai