मुंबई, 13 मार्च : यंदाच्या 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्या भारतवासीयांचं लक्ष लागलं आहे. कारण यंदा पहिल्यांदाच भारताला तीन श्रेणीत नामांकन मिळालं होतं. सध्या लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा पार पडत आहे. ‘सर्वोत्कृष्ट मूळ गाणे’ श्रेणीत नामांकन मिळालेल्या एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्यावर प्रत्येक देशवासीयांचे लक्ष लागले आहे. इतकंच नाही तर गुजराती चित्रपट ‘चेलो शो’सह दोन माहितीपटही यावेळी ऑस्करसाठी नामांकित आहेत. ‘चेल्लो शो’ हा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म श्रेणीसाठी भारताचा अधिकृत प्रवेश आहे, तर ऑल दॅट ब्रीदस या माहितीपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ श्रेणीत आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट्स’मध्ये नामांकन मिळाले होते. आता ऑस्करच्या पुरस्कार सोहळ्यातून मोठी अपडेट समोर येत आहे. नुकतंच द एलिफंट व्हिस्परर्सने यंदाचा ऑस्कर पटकावला आहे. आता भारतासाठी दुरी मोठी अभिमानास्पद बाब समोर येत आहे. आरआरआर सिनेमातील ‘नाटू नाटू’या गाण्याने यंदाचा बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीत ऑस्कर जिंकला आहे. नाटू नाटू या गाण्यानं लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकलं आहे. अप्लॉज, होल्ड माय हँड, लिफ्ट मी अप आणि दिस इज ए लाइफ या गाण्यांना मागे टाकत ‘नाटू नाटू’ ने ऑस्कर पटकावला आहे. नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे. Oscars 2023 : अभिमानस्पद! भारताने पटकावला यंदाचा पहिला ऑस्कर; ‘या’ श्रेणीत जिंकला ऑस्कर पुरस्कार संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘मी कारपेंटर्सची गाणी ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे’, असं किरावानी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्यावर मंचावर गाणं म्हटलं. हा उपस्थित आणि सर्वच भारतीयांसाठी खूप अभिमानाचा क्षण होता.
'Naatu Naatu' from 'RRR' wins the Oscar for Best Original Song! #Oscars #Oscars95 pic.twitter.com/tLDCh6zwmn
— The Academy (@TheAcademy) March 13, 2023
एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नातू नातू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताने दोन ऑस्कर जिंकले आहेत. राजामौली यांनी ‘नाटू नाटू’ जागतिक पातळीवर नेण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गायक ए.आर. रहमाननेही म्हटले होते की, ‘नाटू नाटू’ने ऑस्कर जिंकावे, कारण तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाच्या संस्कृतीचा विजय असेल.
नाटू नाटू हे गाणं अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. 2022मध्ये नाटूनाटू गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती. नाटू नाटू या गाण्याला काही दिवसांआधीच गोल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला.