Home /News /entertainment /

Oscar 2022: ऑस्कर पुरस्काराच्या ट्रॉफीची किंमत आहे केवळ 1 डॉलर? यामध्ये कुणाची आहे मूर्ती?

Oscar 2022: ऑस्कर पुरस्काराच्या ट्रॉफीची किंमत आहे केवळ 1 डॉलर? यामध्ये कुणाची आहे मूर्ती?

Oscar 2022: ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्यांशिवाय या पुरस्काराबद्दल बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. या ऑस्कर पुरस्काराच्या ट्रॉफीवर कोणाची मूर्ती आहे, हे माहितीये का?

मुंबई, 28 मार्च: जागतिक सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ऑस्कर पुरस्कार (Oscar award 2022) ओळखला जातो. या पुरस्काराला आणि सोहळ्याला विशेष महत्त्व असतं. आज (28 मार्च 22) 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. लॉस अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्यांशिवाय या पुरस्काराबद्दल बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. या ऑस्कर पुरस्काराच्या ट्रॉफीवर कोणाची मूर्ती आहे, हे माहितीये का? ऑस्करच्या ट्रॉफीवर मूर्ती कोणाची? पहिला ऑस्कर पुरस्कार (First Oscar award) सोहळा 16 मे 1929 रोजी आयोजित करण्यात आला होता. 1927 मध्ये अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसच्या बैठकीत प्रथमच ट्रॉफीच्या डिझाइनवर चर्चा झाली. यावेळी लॉस अँजेलिसमधील अनेक कलाकारांना त्यांच्या डिझाइन्स सादर करण्यास सांगण्यात आली. त्या सर्व डिझाईनपैकी शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ले यांनी साकारलेलं शिल्प आणि डिझाइन सर्वांना आवडलं. ऑस्कर विजेत्यांना देण्यात आलेली ही ट्रॉफी मेक्सिकन चित्रपट निर्माता आणि अभिनेता एमिलियो फर्नांडिस यांच्यापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. तसंच काही जण ही मूर्ती फर्नांडिस यांचीच आहे, असंही म्हणतात. हे वाचा-Oscars 2022 Winners List: यंदा कोण ठरले ऑस्करचे मानकरी? एका क्लिकवर वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी मूर्तीबद्दलची कथा काय? 1904 मध्ये मेक्सिकोच्या कोआहुइलिया येथे जन्मलेले एमिलियो मेक्सिको क्रांतीदरम्यान मोठे झाले. हायस्कूल सोडले आणि फर्नांडिस हुरिस्टा बंडखोरांचे अधिकारी बनले. त्यांना शिक्षाही झाली, पण ते पळून गेले. यानंतर फर्नांडिस यांनी हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. इथं त्यांना सायलेंट फिल्म स्टार डोलोरेस डेल रिओने एल इंडिओ असं नाव दिलं गेलं. पुढे ते दोघं चांगले मित्र झाले. रिओ मेट्रो गोल्डविन या मेयर स्टुडिओचे आर्ट डायरेक्‍टर कॅड्रिक गिबन्स यांच्या पत्नी आणि अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्य होत्या. डेल रिओने फर्नांडिसची गिबन्सशी ओळख करून दिली, गिबन्स त्यावेळी मूर्तीच्या डिझाइनवर काम करत होते. गिबन्सने फर्नांडिसला 8.5 पौंड वजनाच्या ट्रॉफीचा आधार असलेल्या स्केचसाठी पोझ देण्यास सांगितलं. फर्नांडिसने मनात नसतानाही पोझ दिली आणि ती आयकॉनिक पोझ बनली. जॉर्ज स्टॅन्ले यांनी पुढे त्या मूर्तीसह ट्रॉफी तयार केली आणि ही ट्रॉफी 1929 मध्ये लॉस अँजेलिस येथे झालेल्या पहिल्या ऑस्कर सोहळ्यात देण्यात आली. त्यामुळेच या ऑस्कर ट्रॉफीमध्ये फर्नांडिस असल्याचं म्हटलं जातं. हे वाचा- आतापर्यंत 'या' 5 भारतीयांनी उंचावलं आहे देशाचं नाव, ऑस्करवर नाव कोरणारे कोण आहेत हे दिग्गज कलाकार? ट्रॉफीची किंमत किती? ऑस्करच्या नियमांनुसार, ऑस्कर विजेत्याकडे त्याच्या ट्रॉफीची पूर्ण मालकी नसते. विजेत्याला ट्रॉफी इतरत्र कुठेही विकता येत नाही. जर एखाद्या विजेत्याला ही ट्रॉफी विकायची असेल तर सर्वप्रथम ती ट्रॉफी देणाऱ्या अकादमीला विकावी लागेल. अकादमी ही ट्रॉफी केवळ 1 डॉलरमध्ये खरेदी करेल. त्यामुळे या ट्रॉफीची किंमत (Oscar trophy price) एक डॉलर मानली जाते. पण वास्तविक ही ट्रॉफी बनवण्यासाठी लागणारी रक्कम यापेक्षा खूप जास्त आहे.
First published:

Tags: Oscar, Oscar award, Oscar award show

पुढील बातम्या