मुंबई 30 मे: आजकाल नेटफ्लिक्स आल्यापासून टीव्ही, रेडिओ यांच्याशी अनेकांचा संबंध येत नाही. पण आधीच्या काळात टीव्हीवर लागणारे असे काही क्लासिक शो होते जे हमखास बघितले जायचे. तुम्ही जर मिलेनियल (Millennial Tv Shows)असाल तर तुमच्या तोंडावर आधीच या कार्यक्रमांची नावं आलेली असतीलच. कोणते आहेत हे हिट टीव्ही कार्यक्रम? सोनपरी (Sonpari) 2000 सालच्या काळात आलेला हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला होता. जे जे अभिनेत्री मृणाल कुलकर्णीला (Mrunal Kulkarni) सोनपरी म्हणून ओळखतात त्यांनीच हा कार्यक्रम न चुकवता पाहिला आहे असं म्हणता येईल. आयुष्यातल्या सगळ्या समस्या सोडवायला एक परी आयुष्यभर आपल्याला मिळाली तर किती मजा येईल? या विचारात ही मालिका बघत अनेकजण मोठे झाले आहेत. यातील फ्रुटी या पात्राचे सुद्धा आजही अनेक चाहते आहेत.
करिष्मा का करिष्मा (Karishma Ka Karishma) मराठी दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका अमेरिकन सिटकॉम ‘स्मॉल वन्डर’ चा रिमेक आहे. झनक शुक्ला या गोड मुलीने यात करिष्मा या रोबोटची भूमिका केली होती. सायन्स फिक्शन अश्या जॉनरची विनोदी अंगाने केलेली एक खूप सुंदर बांधणी या मालिकेत दिसते.
शरारत- थोडी जादू थोडी नजाकत (Shararat) फरीदा जलाल, श्रुती सेठ यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. तुमच्या 18 व्या वाढदिवसाला तुम्हाला जादुई शक्तीच भेट मिळाली तर? कोणीही जितकं खुश होईल तितकीच या मालिकेत घडणारे अजब किस्से बघून प्रेक्षक आजही खुश होतात.
साराभाई व्हर्सेस साराभाई (Sarabhai vs Sarabhai) या मालिकेने लावलेलं वेड आजही तेवढंच आहे याची जाणीव या मालिकेचा असलेला फॅनबेस बघून होते. हायक्लास सोसायटीची माया, मिडलक्लास घरची मोनिशा, यांच्या कचाट्यात अडकलेला गुड बॉय साहिल, खोडकर कळीचा नारद इंद्रवदन आणि विचित्र कविता करणारा रोसेश. या परिवारात रोज घडणाऱ्या गोष्टी बघताना मजा यायची. यांच्या परिवाराचाच एक भाग असल्यासारखे प्रेक्षक ही मालिका पाहायचे आणि पसंत करायचे.
दिल मिल गये (Dil Mil Gaye) तुमच्यापैकी अनेक मुलामुलींचा यातील हँडसम डॉक्टरांवर जीव जडला असणार याची खात्री आहे. अरमान-रिद्धिमा यांची प्रेमकहाणी बघताना अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. एवढ्या सुंदर डॉक्टरांमुळे अर्धा रोग बघूनच बरा होईल असं अजूनही गंमतीत अनेकजण म्हणतात.
हम पांच (Hum Paanch) विनोदाचा बादशाह अशोक सराफ, त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारी त्यांची मृत बायको आणि त्यांच्या 5 अजब स्वभावाच्या मुली हे मिश्रण एवढं जबरदस्त होतं की हसून पुरती वाट लागायची. हे कुटुंब आपल्याच आजूबाजूला राहत असावं अशा हक्काने ही मालिका पाहिली जायची. या मालिकेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला विद्या बालन (Vidya Balan tv show) नावाची कुशल अभिनेत्री सुद्धा मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.