मुंबई, 11 जून: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला एक वर्ष होत आलं आहे. येत्या 14 जून रोजी सुशांतला जाऊन एक वर्ष पूर्ण होईल. बॉलिवूडच नव्हे तर सगळ्या देशाला हादरवून टाकणारी ही घटना लोकं आजही विसरलेले नाहीत. फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून चाहते सुशांत सिंहच्या आठवणींना उजाळा देत असतात. सोशल मीडियावर सतत त्याच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होत असतो. नुकतीच छोट्या पडद्यावरील महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची (Shri Krishna) भूमिका साकारल्याने प्रसिद्ध झालेले अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bhardwaj) यांनीही सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नितीश भारद्वाज यांनी सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांच्याबरोबर केदारनाथ या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटावेळचा एक भावुक किस्सा त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला असून, त्यात सुशांत, सारा यांच्यासह नितीश भरद्वाज आणि त्यांच्या जुळ्या मुली (Twin Daughters) आहेत. मुलींच्या संदर्भातीलच हा किस्सा त्यांनी सांगितला आहे. ‘2018 मध्ये 30 एप्रिल रोजी केदारनाथ चित्रपटाचं शूटिंग खोपोलीत सुरू होतं. अंडर वॉटर सीनची (Under water scene) तयारी सुरू होती. त्यावेळी माझ्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवांजनी शूटिंग पहायला आल्या होत्या. दोघी अतिशय हुशार असून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळं दोघींची सुशांत आणि साराशी लगेचच मैत्री झाली. दोघींनी सुशांतला सांगितलं की त्या मेमध्ये त्यांचा 6 वा वाढदिवस (Birthday) साजरा करणार आहेत. त्यावर सुशांतनं त्यांना त्यांच्या वाढदिवसाला फोन करून शुभेच्छा देईन, असं आश्वासन दिलं. दोघीही वाढदिवशी त्याच्या फोनची वाट पाहत राहिल्या; पण सुशांतचा फोन आला नाही. मी मुलींना समजावलं की, तो बिझी असेल. आम्ही पुन्हा जूनमध्ये शूटिंगसाठी भेटलो तेव्हा सुशांतला त्याच्या प्रॉमिसची (Promise) आठवण झाली. तो फोन करायला विसरला होता.’ हे वाचा- ‘कर्जात बुडाली होती नुसरत, मी मोठी रक्कम दिली’; निखिल जैनचा मोठा खुलासा भारद्वाज यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘मुलींशी त्याचं बोलणं करून द्यावं अशी विनंती सुशांतनं मला केली. मी मुलींना फोन लावला. दोघीही ऑनलाईन आल्यावर सुशांतनं आपल्या चुकीबद्दल दोघींची माफी मागितली. त्यांचा रुसवा निघेपर्यंत त्यानं त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी त्यांच्या वयाचा होऊन तो गप्पा मारत होता. शिवांजनीनं लगेच त्याला माफ करून टाकलं; पण देवयानी ऐकायला तयार नव्हती. त्यावर तिची समजूत निघेपर्यंत तो तिला समजावत राहिला. त्याचं हे इतकं गोड वागणं बघून मी खूपच प्रभावित झालो. इतका मोठा स्टार असूनही आपल्या चुकीसाठी लहान मुलींकडे माफी मागण्यात त्यानं कमीपणा मनाला नाही, त्याच्या मनाचा हा मोठेपणा पाहणं हा खूप विलक्षण अनुभव होता. माझ्या दोन्ही मुली तर त्याच्यावर खूपच खूश होत्या.’
‘आजही मी हा अनुभव विसरू शकत नाही, सुशांत सिंह राजपूत अत्यंत संवेदनशील आणि निगर्वी होता. इतकं यश मिळूनही त्याचे पाय जमिनीवर होते. त्याला कसलाही अहंकार नव्हता,’ असंही नितीश भारद्वाज यांनी म्हटलं आहे.