मुंबई,22मार्च- एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआर चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्यावर केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातीलही स्पर्धक थिरकत आहेत. 95 व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकलेल्या या गाण्याला एमएम कीरावानी यांचं संगीत, चंद्र बोस यांचं गीत, काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांचा आवाज आणि प्रेम रक्षित यांची कोरिओग्राफी लाभली आहे. 'नाटू नाटू' मधील राम चरण-ज्युनियर एनटीआरच्या नृत्याचं प्रचंड कौतुक होत आहे. प्रेम रक्षितने या गाण्यामध्ये हटके हुक स्टेप बसवत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. परंतु एक काळ असा होता प्रेमला पोटभर अन्नासाठी संघर्ष करावा लागत असे.
आता सर्वांसाठी सुपरस्टार कोरिओग्राफर बनलेल्या प्रेम रक्षितने त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. परिस्थिती इतकी वाईट बनली होती की प्रेमने आपला जीव देण्याचा विचार सुरु केला होता. प्रेमची संघर्षगाथा ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की, आयुष्यात कितीही संकटे आली तरी धैर्य आणि संयम राखला तर वाईट काळ नक्कीच चांगल्यामध्ये बदलतो. एके दिवशी आपल्या कामाची जागतिक पातळीवर चर्चा होईल याची प्रेमने कल्पनाही केली नव्हती. हा काळ त्याच्यासाठी लाईफ टर्निंग पॉईंट ठरला आहे.
दैनिक भास्करला दिलेल्या एका मुलाखतीत प्रेम रक्षित यांनी सांगितलं होतं की, 'मी कसाबसा 10वी पास झालो आणि टेलरच्या दुकानात काम करु लागलो. 1994 सालची गोष्ट आहे, एके दिवशी मी घरी परतलो तेव्हा माझा धाकटा भाऊ, ज्याला बोलता आणि ऐकता येत नव्हतं, त्याला पोटात तीव्र वेदना होत होत्या. आईने सांगितलं की त्याने 2 दिवसांपासून काहीही खाल्लं नाहीय. आईकडे एक छोटा चांदीचा कुंकवाचा डबा होता. मी तो घेऊन जवळच्या औषधाच्या दुकानात गेलो तेव्हा तिथे ती पेटी ठेऊन 20 रुपये घेतले. मी त्या 20 रुपयांनी तांदूळ विकत घेतले आणि आम्ही सर्वांनी भात शिजवून खाल्ला. प्रेमच्या या खुलाशाने सर्वच थक्क झाले आहेत.
प्रेम रक्षितने पुढे सांगितलं की, 'दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मी साईबाबांच्या मंदिरात गेलो होतो. आर्थिक संकटाने त्रस्त होऊन मंदिरातून बाहेर पडलो, जीव द्यायचा विचार करु लागलो आणि उधार घेतलेली सायकल घेऊन मरीना बीचवर गेलो, मग ज्याची सायकल आहे तो अस्वस्थ होईल असा विचार केला. असाच विचार करुन मी निघून आलो. आणि वडिलांना सायकल द्यायची आणि परत यायचा विचार केला. आणि सायकल देऊन वळताच वडिलांनी हाक दिली आणि सांगितले की माझ्यासाठी एक्स्ट्रा डान्सर म्हणून काम आहे.. त्यावेळी माझ्या मनात एकच गोष्ट घोळत होती आणि ती म्हणजे 'श्रद्धा सबुरी'.या एका गोष्टीने आयुष्याला नवा मार्ग मिळाला'.
या सर्व घटनेनंतर प्रेम रक्षितने नृत्य शिकलं, कोरिओग्राफर बनले आणि पैशासाठी राजामौली आणि किरवाणीच्या मुलांना नृत्य देखील शिकवलं आहे. प्रेम आज एक यशस्वी कोरिओग्राफर बनला आहे मात्र आजही त्याने आपला वाईट काळ विसरला नाहीय. तो नेहमीच गरीब-गरजू कलाकारांना संधी देत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Oscar 2023, South film