मुंबई, 12 सप्टेंबर: पंजाबी रॅपर-गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडांनी अभिनेता सलमान खान लाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांची एक टीम लवकरच पंजाबला जात असून, तिथे सलमान खान केससंदर्भात चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या एका टीमने अभिनेता सलमान खानच्या घरी भेट दिली आणि तिथून पाहणी करून टीम बाहेर पडली आहे. ती एक रूटीन प्रोसेस असल्याचं सांगितलं जात आहे. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. सलमान खानच्या घराची टेहळणी करणाऱ्या कपिल पंडित नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अलीकडेच अटक केली होती. पोलिस आता त्याची चौकशी करत आहेत. पंजाब पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितलं, की कपिल पंडित चौकशीदरम्यान हे कबूल केलं, की त्याने सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्यासोबत मिळून लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरूनच सलमान खानच्या मुंबईतल्या घराची टेहळणी केली होती. गोल्डी बराड हा यामागचा मास्टरमाइंड आहे. हेही वाचा - ‘किसी का भाई किसी की जान’; नव्या रूपात भेटीला आला सलमान खान, टीझरनं जिंकलं मन सलमान खानचे वडील सलीम खान यांना एका पार्कमध्ये सकाळच्या वेळेत एक पत्र मिळालं होतं. त्यात असं लिहिलं होतं, की ‘तुमचाही मुसेवाला करण्यात येईल.’ जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या घराची आणि त्याची सुरक्षाव्यवस्था कडक केली होती. त्याला घरातून बाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली होती. याचदरम्यान, तो कडक सुरक्षाव्यवस्थेत एका सिनेमाच्या शूटिंगसाठी हैदराबादला गेला होता. त्यानंतर त्याने आपल्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडे शस्त्रपरवान्यासाठी अर्ज केला होता. पोलिसांनी तो अर्ज मंजूर करून त्याला शस्त्रपरवाना दिला होता. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. मुंबई पोलिसांनी दिल्लीत जाऊन या संदर्भात त्याची अनेक तास चौकशी केली होती; मात्र आपल्याच सांगण्यावरून सलमान खानला धमकी देण्यात आली, तसंच त्याच्या घराची टेहळणी करण्यात आली, हे मान्य करण्यास लॉरेन्सने नकार दिला होता. आता ते किती खरं आहे, हे येत्या काळात कळेलच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.