मुंबई, 23 जुलै- यंदाच्या 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना ‘मी वसंतराव’ या चित्रपटासाठी मिळाला आहे.याबाबत आता कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या पुरस्काराबाबत बोलताना राहुल देशपांडे यांनी म्हटलंय, ‘हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझं नाव या पुरस्कारासाठी जाहीर झालं त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आलं. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव जरी माझं असलं तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली.’’ तसेच त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहलंय, ‘‘मी मोठा होत असताना वैयक्तिक स्पर्धांऐवजी सांघिक स्पर्धांचा आनंद घ्यायचो. मला असं वाटतं की, मी “मी वसंतराव” या महान कार्याचा एक भाग आहे ज्याचा खरा नायक निपुण आहे. त्याची दृष्टी आणि आम्हा प्रत्येकावरचा दृढ विश्वास यामुळेच हे शक्य झालं. माझ्या आजोबांना म्हणजेच होऊन गेलेल्या एका महान कलाकाराला न्याय देण्याचं स्वप्न मी निपुणसोबत पाहिलं होतं. “मी वसंतराव” या उत्कृष्ट रचनेचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. पण खरा शिल्पकार निपुण आहे. म्हणून हा सन्मान मी निपुणसोबत शेअर करतो!! तसेच, सारंग कुलकर्णी, विजय दयाल आणि आमचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्व गायक, गीतकार आणि तंत्रज्ञांसह मी माझ्या संपूर्ण संगीत टीमचे अभिनंदन करतो. मला अनमोलचा खूप अभिमान आहे (आता त्याची सवय झाली आहे).
**(हे वाचा:** Ranjana Deshmukh: ‘रंजना…अनफोल्ड’ मधून उलगडणार रंजनांचा जीवनप्रवास, चित्रपटाबाबत मोठी घोषणा ) याबाबत बोलताना दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी म्हटलंय, ‘’हा क्षण खूप मौल्यवान आहे. ‘मी वसंतराव’ची गाणी हाच या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. आणि आज त्याच्या या मेहनतीचा गौरव झाला आहे. याचा आम्हांला आनंद आहे.’’