मुंबई, 23 जुलै- मराठीत अनेक दिग्गज अभिनेत्री होऊन गेल्या. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख होय. या हरहुन्नरी अभिनेत्रीची जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे. बोलके डोळे, हसरा चेहरा, ठसकेबाज हावभाव आजही प्रेक्षकांना घायाळ करतात. 70-80 च्या दशकात या मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं होतं. त्या आज या जगात नसल्या तरी त्यांच्या अविस्मरणीय कलाकृतींच्या माध्यमातून त्या आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. आता या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जीवन प्रवास पडद्यावर उलगडणार आहे. नुकतंच राजश्री मराठीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची बातमी दिली आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आयुष्यावर आधारित ‘रंजना’ हा चित्रपट लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून या अफाट लोकप्रिय अभिनेत्रीचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. ‘रंजना-अनफोल्ड’ हा चित्रपट पुढील वर्षी 3 मार्च 2023 मध्ये मोठ्या पडद्यावर भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. यामध्ये रंजना यांच्या जुन्या चित्रपटांची झलक पाहायला मिळत आहे. सोबतच पोस्टरच्या पार्श्वभूमीवर रंजना यांचं ‘पाहिले नं मी तुला’ हे सदाबहार गाणं ऐकायला मिळत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत मोहन वारंग तर निर्मिती कार्निव्हल प्रॉडक्शन हाऊस आणि वैशाली सरवणकर करणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेने सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे.
**(हे वाचा:** Man Udu Udu Jhala: अखेर इंद्रा-दीपू अडकले लग्नाच्या बेडीत;साऊथ इंडियन वेडिंग लुक चर्चेत ) रंजना यांनी झुंज, मुंबईचा फौजदार, गुपचूप गुपचूप, बिनकामाचा नवरा, भुजंग,अरे संसार संसार यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री ‘पिंजरा’ फेम संध्या यांच्या भाची आहेत. यशाच्या शिखरावर असताना रंजना यांचा कार अपघात झाला होता. या अपघातामुळे त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ३ मार्च २००० मध्ये त्यांचं निधन झालं होतं.