धनंजय दळवी, प्रतिनिधी
मुंबई, 4 फेब्रुवारी : हिंदी चित्रपट सृष्टीचा इतिहास हा अनेक सदाबहार सिनेमांनी सजलेला आहे. या चित्रपटाची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना लक्षात राहते.. त्याचबरोबर प्रदर्शानंतर बऱ्याच वर्षांनीही तो नव्या पिढीमध्येही तितकाच लोकप्रिय असतो. क्लासिकल हिंदी सिनेमाचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, अशा 'पाकिजा' या सिनेमाला आज 51 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी 51 वर्षांपूर्वी (4 फेब्रुवारी 1972) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची जाहिरात करणारं पोस्टर या निमित्तानं व्हायरल झालं आहे.
कमल अमरोहींचे स्वप्न
पाकिजा हे दिग्दर्शक कमाल अमरोही यांचे स्वप्न होते. अमरोही आणि चित्रपटाची नायिका मीना कुमारी यांच्या प्रेमाचे किस्से त्या काळात चांगलेच गाजले होते. या सिनेमाचे शुटींग सुरू असताना मीनाकुमारीची तब्येतही फारशी चांगली नव्हती. या सर्व अडचणीनंतर हा सिनेमा 4 फेब्रुवारी 1972 रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा मुंबईतील ज्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला त्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मुंबईतील मराठा मंदिर, रिगल, लोटस, जयहिंद या तेव्हाच्या प्रमुख चित्रपटगृहात हा सिनेमा रिलीज झाल्याचं या पोस्टरवरुन स्पष्ट होत आहे.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी या चित्रपटाबद्दल विशेष आठवण सांगितली आहे. 'त्या काळामध्ये चित्रपटाचे पोस्टर हे जाहिरातीचे मुख्य साधन होतं. हे पोस्ट वेगवेगळ्या गल्लीत, बस स्टॉपवर, दिव्याच्या खांबावर लावली जात. तसंच होर्डिंगच्या माध्यमातूनही जाहिरात होत असे. मुस्लीम सोशल सिनेमा असं पाकिजाचं वैशिष्ट्य होतं. त्या सिनेमाची गाणी ही विषयाशी निगडित होती.
बॉक्स ऑफिसवर किंग खानचा जलवा कायम; दहाव्या दिवशीही 'पठाण'ची छप्परतोड कमाई
हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा मराठा मंदिर हे महत्त्वाचे थेटर होतं. मराठा मंदिरचे वैशिष्ट्य असं होतं की तिथे सादर करण्यात येणारा देखावा हा नेहमीच पाहण्यासारखा होता. असे अनेक चित्रपटांचे येथील देखावे गाजले आहेत.'
सहानुभूतीचा फायदा
' 4 फेब्रुवारी 1972 रोजी सिनेमा प्रदर्शित झाला. सुरुवातीला काही काळ हा चित्रपट फारसा चालला नाही. त्या काळात सिनेमा हिट झाला नसला तरी लवकर सिनेमागृहातून काढला जात नसे. गाणी, डायलॉग याच्या जोरावर काही काळानं सिनेमा हिट होईल असा निर्माता-दिग्दर्शकांना विश्वास होता. पाकिजाच्या प्रदर्शनानंतर दोन महिन्याच्या आत मीनाकुमारी यांचे निधन झाले. त्यानंतर सिनेमाबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली आणि तो हिट झाला,' अशी आठवण ठाकूर यांनी सांगितली.
गाण्यांनी रचला इतिहास
पाकिजा चित्रपटाला मीनाकुमारीचा अभिनय, कमाल अमरोही यांचे स्वप्न या गोष्टींप्रमाणे एकाहून एक सरस गाण्यांमुळे ओळखलं जातं. ‘चलो दिलदार चलो चांद के पार के पार चलो’, ‘इन्हीं लोगों ने ले लीना दुपट्टा मेरा’, ‘ठाढे रहियो ओ बांके यार रे’, ‘चलते चलते यूं ही कोई मिल गया था’, ‘आज हम अपनी दुआओं का असर देखेंगे’, ‘मौसम है आशिकाना’ या चित्रपटातली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. नौशाद यांनी या सिनेमाला संगीत दिलं होतं. त्यांच्या संगिताचा गोडवा आजही कायम आहे.
'या चित्रपटातले डायलॉग हिट झाले. राजकुमार, अशोक कुमार, मीना कुमारी यांच्या अभिनयाच प्रचंड कौतुक झालं. आणि मराठा चित्रपट मंदिरामध्ये तब्बल 50 आठवडे या चित्रपटाने मुक्काम केला असून ही एक ऐतिहासिक घटना आहे. एकाच वेळेस मराठा मंदिर, रिगल आणि लिबर्टी अशी दक्षिण मुंबईतील तीन महत्वाच्या चित्रपट गृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.' विशेष म्हणजे त्यावेळेसचे तिकीट दर देखील एक रुपयापासून ते चार रुपये पर्यंत दर होते, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Local18, Mumbai, On this Day, Photo viral