बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा 'पठाण' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तब्बल चार वर्षानंतर कमबॅक करत शाहरुख खानने धमाका केला आहे. अभिनेत्याची ही दमदार वापसी असल्याचं म्हटलं जात आहे. 'पठाण' चित्रपटाने रिलीजपूर्वीच ऍडव्हान्स बुकिंगमध्ये अनेक रेकॉर्ड मोडीत काढले होते. २५ जानेवारीला रिलीज झालेल्या 'पठाण' ने पहिल्याच दिवशी तुफान कमाई करत. ओपनिंग डेमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळजवळ दहा दिवस झाले आहेत. मात्र अद्याप बॉक्स ऑफिसवर किंग खानची जादू दिसून येत आहे. नव्या रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या 'पठाण'ने १० व्या दिवशी तब्बल १५ कोटींचा व्यवसाय केला आहे. अर्ली ट्रेड्सच्या मते दहाव्या दिवसाच्यामानाने ही कमाई फारच छान आहे. 'पठाण'ची भारतातील एकूण कमाई झाली तर, सिनेमाने देशात एकूण ३७९.१८ कोटींची कमाई केली आहे.