मुंबई, 27 मे- ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. त्यामुळेच ही मालिका टीआरपी रेसमध्ये नेहमीच टॉप 10 मध्ये समाविष्ट असते. मालिकेतील गोड चिमुकली परी (Pari) आणि यश-नेहाची (Yash & Neha) केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे. नेहा आणि यश यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. आता लवकरच मालिकेत नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. अनेक संकटाना मात करत नेहा-यश एकत्र येणार आहेत. मालिकेत आता या जोडप्याचा साखरपुडा पार पडलेला पाहायला मिळणार आहे. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेत यश आणि नेहाची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेत आणखी एका व्यक्तीने चांगलीच रंगत आणली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे इतर कुणी नसून चिमुकली परी होय. प्रामुख्याने या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी ही मालिका आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक नेहमीच मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात.
या मालिकेत सध्या यश-नेहाच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु आहे. मालिकेत नेहा आणि यशला आल्या प्रेमासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. एकीकडे एक मुलगी असणारी सर्वसामान्य घरातील नेहा आणि दुसरीकडे एक उद्योगपती आई-वडील गमावलेला आजोबांनी, काका-काकींनी सांभाळ केलेला यश. या दोघांना आपले कुटुंब आणि त्यांच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. त्यामुळे त्यांना नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी अनेक अग्निदिव्ये पार करताना पाहिलं जात आहे. परंतु मालिकेत लवकरच नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. **(हे वाचा:** ‘हे काही आठवडे…’ Cannes रेड कार्पेटवरील फोटो शेअर करत जितेंद्र जोशीने लिहिली लक्षवेधी पोस्ट ) येत्या भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे नवे प्रोमो पाहायला मिळत आहेत. यामध्ये नेहा आणि यश आपल्या साखरपुड्यासाठी पारंपरिक अंदाजात नटलेले दिसून येत आहेत. नेहाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. केसांत गजरा माळला आहे. शिवाय सुंदर अशी ऑक्सइड ज्वेलरी घातली आहे. नेहाचा हा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय साखरपुड्यानंतर चिमुकली परी सर्व प्रेक्षकांना लग्नाला येण्याचा गोड आग्रह करताना दिसून येत आहे. प्रेक्षक मालिकेतील हा ट्रॅक पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.