मुंबई, 28 मे- ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazi Tuzi Reshimgath) ही मालिका सध्या फारच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अनेक संकटांना मात करत यश-नेहा (Yash-Neha) एकत्र येणार असल्याचं दिसत आहे. येत्या काही एपिसोडमध्ये या दोघांचा साखरपुडा आणि राजेशाही थाटातील लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. साखरपुड्याचं शूटिंग पूर्ण झालं आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परंतु आणखी एक बातमी समोर आली आहे. लवकरच नेहा-यशच्या ग्रँड वेडिंगचं शूटिंग केलं जाणार आहे. झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पवधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. मालिकेत यश आणि नेहाची अनोखी केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेत आणखी एका व्यक्तीने चांगलीच रंगत आणली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे इतर कुणी नसून चिमुकली परी होय. प्रामुख्याने या तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणारी ही मालिका आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. त्यामुळे प्रेक्षक नेहमीच मालिका पाहण्यासाठी उत्सुक असतात.
मराठी मालिका डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, साखरपुड्याच्या भागानंतर लवकरच यश आणि नेहा लग्नगाठ बांधणार आहेत. साखरपुड्याची फोटो आणि व्हिडीओ तर सोशल मीडियावर समोर आले आहेत. पण अनेकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. या पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच नेहा आणि यश आपल्या ग्रँड वेडिंगचं शूटिंग करणार आहेत. हे शूटिंग सिल्व्हासा याठिकाणी केलं जाणार आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील वेडिंग ट्रॅकनंतर मराठी मालिकांमधील हा दुसरा सर्वात मोठा लग्नसोहळा शूट केला जाणार आहे. प्रेक्षक या रॉयल वेडिंगसाठी फारच उत्सुक आहेत. **(हे वाचा:** VIDEO: लवकरच पार पडणार नेहा-यशचा साखरपुडा, चिमुकली परी करणार खास आवाहन ) लग्नापूर्वी अर्थातच येत्या भागात यश आणि नेहाचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. सध्या सोशल मीडियावर या मालिकेचे नवे प्रोमो पाहायला मिळत आहेत. यामध्ये नेहा आणि यश आपल्या साखरपुड्यासाठी पारंपरिक अंदाजात नटलेले दिसून येत आहेत. नेहाने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. केसांत गजरा माळला आहे. शिवाय सुंदर अशी ऑक्सइड ज्वेलरी घातली आहे. नेहाचा हा लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय साखरपुड्यानंतर चिमुकली परी सर्व प्रेक्षकांना लग्नाला येण्याचा गोड आग्रह करताना दिसून येत आहे. प्रेक्षक मालिकेतील हा ट्रॅक पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.