मुंबई, 26 एप्रिल: झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgath) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मालिकेतील यश नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो आहे. ही मालिका टीआरपीमध्येही पहिल्या दहा मालिकांमध्ये असते. मालिकेतील मुख्य पात्रांप्रमाणे इतरही काही पात्र आहेत जी प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. या मालिकेतील आजोबा, बंडू काका-काकी, समीर, शेफाली, सिम्मी या आणि अशा इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहेत. प्रेक्षकांना मालिकेकडे आकर्षित करण्यासाठी नवनवे ट्विस्ट देखील यामध्ये पाहायला मिळक आहे. आता बंडू काकांसबंधित एक घटना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत बंडू काका हे पात्र आहे, जे वयोमानानुसार काहीसे विसराळू झाले आहेत. अलीकडेच समोर आलेल्या प्रोमोनुसार परी यशच्या पॅलेसवर गेली आहे. मात्र नेमकं हेच विसरल्याने बंडू काका भलत्याच चिमुरडीला परी समजून त्यांच्या घरी घेऊन येतात. बंडू कांकाची पत्नी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते पण ते ऐकत नाहीत. शेवटी त्या मुलीचे कुटुंबीय पोलिसांत तक्रार करतात आणि पोलिसांकडून त्यांना अटक केली जाते. हे वाचा- प्रिया बापटने शेअर केला ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये बोल्ड VIDEO, पाहून नेटकरी म्हणाले….. हा सर्व प्रकार काकू नेहाला फोन करुन सांगतात. तातडीने नेहा आणि यश पोलीस स्टेशनला देखील पोहोचतात. मात्र बंडू कांकांची सूटका होते की नाही हे येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र बंडू काकांचा हा विसरभोळा स्वभाव त्यांच्यासाठीच अडचणीचा ठरणार आहे.
सध्या माझी तुझी रेशीमगाठच्या प्रेक्षकांना यश-नेहाचं लग्न कधी आणि कसं होणार याची प्रतीक्षा आहे. कारण अद्याप यशच्या आजोबांना परीचं सत्य माहित नाही आहे. त्यामुळे हे सत्य त्यांना समजल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे चाहत्यांचं लक्ष लागले आहे.