मुंबई, 29 एप्रिल- मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण 8 चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिखस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चौथा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 22 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. परंतु एका गोष्टीने कलाकरांसह सर्वच प्रेक्षकांची चिंता वाढवली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे ‘मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम’. ‘पावनखिंड’ तसेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी’मध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) होय. या अभिनेत्याने दमदार भूमिका साकारत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. सध्या हा अभिनेता ‘शेर शिवराज’ चित्रपटात दिसून येत आहे. अक्षय सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपल्या पोस्टमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. दरम्यान अक्षयने काही वेळेपूर्वी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून प्रत्येक मराठी प्रेक्षक विचारमग्न झाला आहे, चिंतेत पडला आहे. अक्षय वाघमारे पोस्ट- नमस्कार पोस्ट मोठी आहे पण अत्यंत महत्वाची आहे मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटा साठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही . याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे पण पुढे काहीच साध्य झाले नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला . फर्जंद , फत्तेशिकस्त , पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा , नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्त पणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स . ‘‘सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार ?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का ?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही ? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील .
मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत . जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे .आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार ???बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही … मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’’ … अक्षयची ही पोस्ट पाहून सर्वांच्याच मनात चिंता निर्माण झाली आहे.