मुंबई, 12 डिसेंबर : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी आपल्या अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर आपली एक वेगळी छाप सोडली आहे. ते चार दिवस सासुचे, वादळवाट अशा मालिकांमधून घराघरांत पोहचले. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. वैविध्यपूर्ण पात्र साकारुन त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. अशातच लोकप्रिय अभिनेते विलास यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसून त्यांच्या मित्राने त्यांच्यासाठी आर्थिक आवाहन करत एक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही काळापासून अभिनेते डॉ. विलास उजवणे यांची प्रकृती ठीक नाहीये. ते गेल्या सहा वर्षापासून ब्रेन स्ट्रोकशी झुंज देत आहेत. या आजाराशी दोन हात करता करता त्यांची संपूर्ण जमा पूंजी खर्च झाली आहे. आता त्यांना हृदयाचा त्रास सुरु झाला आहे. या दुर्मिळ आजारात त्यांना कावीळ झाली असून ते रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांचं तात्काळ मोठं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. आता त्यांना पुढच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी त्यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर केली आहे.
विलास उजवणे यांचे मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत सर्वांना त्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे. त्यांनी पोस्टद्वारे सगळ्यांना एकत्र येऊन मदत करण्यास सांगितलंय. सोबतच पोस्टद्वारे त्यांनी डॉक्टरांचे अकाऊंट डिटेल्स ही शेअर केले आहेत. पुढे त्यांनी म्हटलं की, मी वेळोवेळी डॉक्टरांच्या प्रकुती, त्यांची चालू असलेली ट्रीटमेंट या विषयीची अपडेट फेसबुक माध्यमातून आपणास देत राहीन.
दरम्यान, हरहुन्नरी, गोड स्वभावाचे, दिलखुलास अभिनेते डॉ. विलास उजवणे यांनी मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. उजवणे यांनी नाट्यक्षेत्र तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्येही अभिनयाने रसिकांची वाहवा मिळविली आहे. डॉ. उजवणे यांच्या पत्नीचे नाव अंजली उजवणे असून त्यादेखील मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.