मुंबई, 03 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या जाण्याने पुरते बॉलिवूड हादरले आहे. त्याला जाऊन आज 18 दिवस पूर्ण झाले तरी त्याच्या जाण्याचे दुःख अजूनही आहे. अशावेळी तो 'आउटसायडर' होता, त्याचा कुणी 'गॉडफादर' नव्हता, त्याचप्रमाणे 'नेपोटीझम' या कारणामुळे सुशांतने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड मधील काही कलाकारांकडून होत आहे.
दरम्यान इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे. काहींनी त्यांची कहाणी अनेकदा शेअर केली आहे. अशीच कहाणी आहे अभिनेता मनोज वाजपेयी याची. स्ट्रगलच्या काळात मनोजच्या मनातही आत्महत्येचा विचार आला होता. 'Humans Of Bombay' या फेसबुक पेजवर मनोजने त्याच्या आयुष्याचा प्रवास उलगडला आहे.
(हे वाचा-गॅलरीतून दिसते अर्धी मुंबई! पाहा कतरिनाच्या घराचे INSIDE PHOTOS)
यामध्ये मनोज असे म्हणाला आहे की, 'मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. बिहारमधील एका छोट्या गावात 5 भावंडांबरोबर लहानाचा मोठा झालो. आयुष्य साधं होतं. पण जेव्हा जेव्हा आम्ही शहरात जायचो तेव्हा आम्ही सिनेमागृहात जात असू. अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याने, मला नेहमीच त्यांच्यासारखे बनायचे होते. अवघा 9 वर्षांचा होता तेव्हाच मला कळले होते की अभिनय हेच माझे भविष्य आहे.'
या लेखामध्ये त्याने मोठ्या कष्टाने मुंबई कशी गाठली याबाबत भाष्य केले आहे. त्याने एनएसडीमधून अभिनयाचे धडे घेतले आहेत. पण तिथे पोहचणे सुद्धा त्याच्यासाठी सोपे नव्हते.
एनएसडीमधून 3 वेळा नाकारले
मनोजने असे लिहिले आहे की, 'मी या चौकटीत बसू पाहणारा आउटसायडर होतो. त्यामुळे मी स्वत:ला इंग्रजी आणि हिंदी शिकवण्यास सुरूवात केली. माझ्या हिंदीचा भोजपूरी एक मोठा हिस्सा आहे. मी त्यानंतर एनएसडीसाठी अप्लाय केले होते मात्र मला 3 वेळा नाकारण्यात आले. त्यावेळी आत्महत्या करण्याच्या खूप जवळ मी गेलो होतो. माझे मित्र इतके घाबरले होते की ते माझ्या बाजुलाच झोपायचे मला कधी एकटे सोडायचे नाहीत. त्यांनी मला धैर्य दिले आणि अखेर मला स्वीकारण्यात आले.'
'वडापाव देखील महाग वाटायचा...'
त्यानंतर मुंबईत आल्यावरही मनोजचा कठीण काळ संपला नव्हता. त्याबाबत मनोज असे म्हणतो की, 'सुरूवातीची 4 वर्ष खूप खडतर होती. आम्ही 5 मित्र एकत्र चाळीत राहायचो. कामासाठी एका स्टुडिओतून दुसरीकडे पळत होतो. कोणतच काम मिळत नव्हते. एकदा एका एडीने माझा फोटोच फाडून टाकला. एकदा एकाच दिवसात मला तीन वेळा रिजेक्ट करण्यात आले. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. अनेक दिवस तर उपाशीच जायचे. कधीकधी तर वडापाव देखील महाग वाटायचा. पण माझ्या पोटाची भूक यशस्वी होण्याची माझ्या भुकेला मिटवू शकली नाही. 4 वर्षांच्या स्ट्रगल नंतर मला महेश भट्ट यांच्या एका टीव्ही सीरिजमध्ये छोटासा रोल मिळाला. प्रत्येक एपिसोडचे मला 1500 रुपये मिळायचे- ते माझे पहिले स्थीर उत्पन्न होते. त्यानंतर माझे काम इतरांच्या लक्षात येऊ लागले आणि मला माझा पहिला बॉलिवूड चित्रपट मिळाला आणि लवकरच 'सत्या' च्या रुपाने बिग ब्रेक देखील मिळाला'. आता मनोज वाजपेयीने मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे.
संपादन - जान्हवी भाटकर