मुंबई, 17 डिसेंबर : हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांचा प्रसिद्ध चित्रपट ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ म्हणजेच ‘अवतार 2’ नुकताच प्रदर्शित झाला. सध्या सर्वत्र अवतार 2 चीच चर्चा असून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. मात्र हा चित्रपट पाहताना एका व्यक्तीसोबत धक्कादायक पघटना घडल्याचं समोर आलं आहे. ‘अवतार 2’ चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील पेद्दापुरम शहरात येथे एका व्यक्तीचा ‘अवतार 2’ चित्रपट पाहताना हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. लक्ष्मीरेड्डी श्रीनू असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. श्रीनू अवतार 2 पाहण्यासाठी त्याचा भाऊ राजूसोबत पेद्दापुरममधील चित्रपटगृहात गेला होता. मात्र चित्रपट पाहताना श्रीनू अचानक खाली कोसळला. त्याचा लहान भाऊ राजू यानं त्याला तात्काळ पेद्दापुरमच्या शासकीय रुग्णालयात श्रीनूला नेलं मात्र रुग्णालयात पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. लक्ष्मीरेड्डी श्रीनू यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
अशीच काहीशी घटना ‘अवतार’ चित्रपटाच्या पहिल्या भागावेळी घडली होती. 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘अवतार’ चित्रपटाचा पहिला भाग पाहताना तैवानमधील 42 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. एजन्सी फ्रान्स प्रेसने 2010 मध्ये वृत्त दिलं होतं.
दरम्यान, ‘अवतार 2’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री करून बक्कळ कमाई केली आहे. अशा परिस्थितीत या हॉलिवूड चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, अवतार पार्ट 2 ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 40 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या शानदार सुरुवातीने ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने हे सिद्ध केले आहे. आगामी काळात ‘अवतार 2’ कमाईच्या बाबतीत विक्रम करेल.