मुंबई, 21 एप्रिल- सध्या छोटा पडदा असो किंवा OTT प्लॅटफॉर्म यावर अनेक रिअॅलिटी शो जबरदस्त हिट ठरत आहेत. दरम्यान कंगना राणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु झाल्यापासून सतत चर्चेत आहे. हा शो अधिकच रंजक होणार असल्याचं दिसून येत आहे. शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. आगामी भागांमध्ये अंतिम टास्कचे तिकीट कसे घोषित केले जाईल हे दाखविण्यात येत आहे. जो स्पर्धक टास्क जिंकेल त्याला फिनालेचे तिकीट दिले जाईल. या ट्विस्टने प्रोमोची सुरुवात होते. यामुळे स्पर्धकांमध्ये एक नवी ऊर्जा संचारलेलं पाहायला मिळत आहे. स्पर्धक हा टास्क जिंकण्यासाठी वाटेल त्या गोष्टी करायला तयार आहेत. नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पायल रोहतगी म्हणत आहे की, “मला फिनालेमध्ये जाण्यापासून कोण रोखू शकतं ते मी बघेन. प्रोमोच्या दुसऱ्या भागात ती मुनव्वर फारुकीसोबत (Munawar Faruqui) वादविवाद करताना दिसत आहे. त्यांनतर प्रोमोच्या शेवटी, साईशा शिंदे (Saisha Shinde) जाहीर करते की तिला शोमधून जी काही रक्कम मिळेल त्यातील निम्मी रक्कम ती ट्रान्स कम्युनिटीच्या चांगल्यासाठी खर्च करेल. हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आहे. साईशाचा सहस्पर्शक असणाऱ्या अली मर्चंटसह इतरही साईशा शिंदेच्या या निर्णयाचे कौतुक करताना दिसत आहेत. यापूर्वी ETimes ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, साईशा म्हणाली होती की, शोमध्ये सहभागी होण्याचा तिचा एकमेव उद्देश ट्रान्स कम्युनिटीचं प्रतिनिधित्व करणे हाच आहे. याबाबत बोलताना साईशा शिंदे म्हणाली, “माझ्या समुदायाचे प्रतिनिधित्व योग्य व्हावे यासाठी मी या शोमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्येकाने माझ्याकडे केवळ या समाजाचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही पाहावे, कारण शेवटी तुम्ही आमच्याकडे आदराने पाहावे असे समाजातील सर्व लोकांना वाटते. लोकांनी आम्हांला तुम्हा सर्वांपैकीच एक समजावे आणि एकाकी पाडू नये अशी आमची इच्छा आहे.”
शोच्या सुरुवातीच्या भागांदरम्यान, साईशा शिंदेने देखील एक ट्रान्सवुमन म्हणून बाहेर येण्याबद्दल आणि तिला कराव्या लागलेल्या संघर्षांबद्दल स्पष्टपणे सांगितले होते. घर किंवा आधार कार्ड मिळणे किती कठीण होते याचा खुलासा तिने केला होता. लॉक अप Alt Balaji आणि MX Player वर प्रसारित होत आहे. या शोची निर्मिती एकता कपूर करत आहे आणि कंगना राणौत हा शो होस्ट करत आहे.हा शो सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण या शो दरम्यान कलाकार स्पर्धकांचे अनेक सीक्रेट्स उघड झाले आहेत.