नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : दिवंगत अभिनेते ओम पुरी (Om Puri) यांनी अभिनय आणि आवाजाच्या जोरावर आपली ओळख निर्माण केली होती. लहानपणी एका चहाच्या दुकानात कप विसळण्याचं काम करणाऱ्या ओम पुरींनी हॉलिवूडपटांमध्ये काम करण्यापर्यंत यश मिळवलं. ओम पुरी यांची आज (18 ऑक्टोबर) जयंती (Om Puri Birth Anniversary) आहे.
पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या ओम यांचं बालपण खूप कष्टात गेलं. त्यांचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते. पण त्यांची कौटुंबिक स्थिती (Family Background) चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी कोळसा निवडणं, स्वच्छता करण्यापासून चहाच्या दुकानात कप विसळण्याचं काम केलं. त्यांनी चोरी केल्याचा आरोप लावून त्यांना एका ढाब्यावरच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. पण काळ असा बदलला की ते चित्रपटसृष्टीत दाखल झाले आणि आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी लोकांची मनं जिंकली.
ओम पुरींच्या पत्नी नंदिता यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचं नाव होतं ‘अनलाइकली हीरोः ओम पुरी’. त्यात ओम पुरींच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे त्यांनी केले होते. या पुस्तकात एक किस्सा असा होता, की ओम पुरी 14 वर्षांचे असताना त्यांच्या मामांच्या घरात राहणाऱ्या एका 55 वर्षांच्या बाईवर त्यांचं प्रेम (Love) जडलं होतं. ओम पुरींवर घरगुती हिंसाचाराचेही अनेक आरोप लागले होते. नक्षलवाद्यांबद्दल ओम पुरींनी जाहीरपणे केलेल्या एका वक्तव्यामुळेही ते अडचणीत आले होते.
जेव्हा ओम पुरींना अभिनय करावासा वाटला तेव्हा त्यांनी रंगभूमीवर नाटक करायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये शिकताशिकता वकिलाकडे लेखनिकाची नोकरी त्यांनी सुरू केली. ओम पुरींनी मराठी चित्रपट घाशीराम कोतवालच्या माध्यमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 1983 मध्ये आलेल्या ‘अर्धसत्य’ या हिंदी चित्रपटाने त्यांना लोक ओळखू लागले. त्यानंतर त्यांना आक्रोश, आरोहण या चित्रपटांतून आपलं अभिनयाचं कसब दाखवलं.
माझ्या मृत्युचा तर तुम्हाला पत्ताही लागणार नाही झोपेतच मी हे जग सोडून जाईन. तुम्हाला नंतर कळेल की ओम पुरींचं काल सकाळी 7 वाजता निधन झालं, असं ओम पुरींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. प्रत्यक्ष आयुष्यातही तसंच झालं, 6 जानेवारी 2017 ला सकाळी ओम पुरींचं निधन झालं आणि सगळ्या चित्रपटसृष्टीला धक्काच बसला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor