मुंबई, 24 जून- पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवालाच्या (punjabi singer sidhu moosewala) मृत्यूवर त्याच्या चाहत्यांना आजही विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. या गायकाच्या निधनाला जवळजवळ महिना होत आला मात्र, अनेकांना तो आता या जगात नाही या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. सिद्धू आपल्या गाण्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्यामध्ये राहणार आहे. दरम्यान आता त्याच्या निधनाच्या तब्बल 26 दिवसांनंतर त्याचं शेवटचं गाणं 'SYL' रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रेम दिलं आहे.
महत्वाचं म्हणजे सिद्धूचं नवीन रिलीज झालेलं 'SYL' हे गाणं सध्या युट्युबवर ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावरसुद्धा हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणं पाहून गायकाचे चाहते भावुक होत आहेत. शिवाय कमेंट्स करत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. 'SYL' या गाण्यामध्ये गायकाने सतलज-यमुना लिंक कालव्याचा उल्लेख केला आहे. अर्थातच या गाण्यात आपल्याला पंजाबमधील पाणी आणि त्या संबंधित असणाऱ्या विविध गोष्टींबाबत ऐकायला मिळत आहे. हे गाणं 4 मिनिट 6 सेकंदाचं आहे.
सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही तासांत या गाण्याला तब्बल 6 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याच्या सुरुवातीला आपल्याला आम आदमी पार्टीचे हरियाणाचे प्रभारी सुशील गुप्ता यांचं विधान ऐकू येतं. त्यांनतर गाण्याला सुरुवात होते.
नेमकं काय घडलं होतं-
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मानसा येथे सिद्धू यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत सिद्धुचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंजाबमधील भगवंत मान सरकारने 424 महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय नुकताच घेतला. सुरक्षा काढून घेतलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याचा ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Punjab, Singer