मुंबई, 13 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. त्याच ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. देशभरातून या चित्रपटाला विरोध होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावरून दोन गट दिसून येत आहेत. यामध्ये आमिर खानला काहींनी सपोर्ट केला आहे तर काहींनी सडकून टीका केली आहे. दरम्यान समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता आमिर खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप लावण्यात आला आहे. नुकतंच समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, दिल्लीतील एका वकिलाने दिल्ली कमिशनर संजय अरोडा यांच्याजवळ आमिर खान विरोधात तक्रार दाखल केली आहे. फक्त आमिर खानच नव्हे तर प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपटासंबंधी इतर काही व्यक्तींविरोधातसुद्धा तक्रार दाखल करण्यात आली आहे.‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाने भारतीय सैन्य आणि हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप या वकिलांनी केला आहे. विनीत जिंदल नामक या वकिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये आक्षेपार्ह कंटेंट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जिंदल आमिर खान, प्रॉडक्शन हाऊस आणि दिग्दर्शक अद्वैत चंदनविरोधात आयपीसीच्या कलम १५३, १५३ अ, २९८ आणि ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करु इच्छितात. **(हे वाचा:** माफी मागूनही आमिरचं नशीब खराब; Laal Singh Chaddha चे तब्बल 1300 शो रद्द ) या तक्रार अर्जामध्ये विनीत जिंदल यांनी लिहलंय, ‘‘या चित्रपटात एका मतिमंद व्यक्तीला कारगिल युद्ध लढण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल केल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र सर्वानांच माहिती आहे की , कारगिल युद्धासाठी देशातील सर्वोत्तम जवानांना पाठवण्यात आलं होतं. अत्यंत कठोर परिश्रम घेऊन या सैनिकांनी स्वतःला युद्धासाठी तयार केलं होतं. परंतु या चित्रपटात जाणूनबुजून त्या परिस्थितीला भारतीय सैन्याला बदनाम करण्यासारखा सीन क्रिएट करण्यात आला आहे’’. असं मत जिंदल यांनी व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.