मुंबई, 20 सप्टेंबर : ‘चला हवा येऊ द्या या’ कार्यक्रमातून अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सर्वांचा लाडका विनोदवीर म्हणजे अभिनेता कुशल बद्रिके. अनेक वर्ष सिनेसृष्टीत काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा कुशल सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. अनेक मजेशीर व्हिडीओ आणि फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याला चाहते चांगला प्रतिसाद देखील देतात. आजकाल कुशल सोशल मीडियावर छान लिहितो. फोटो पोस्ट करत त्याला मस्त कॅप्शन कुशल लिहीत असतो. आजही त्याने काही फोटो शेअर केले आहेत. पण त्या फोटोना दिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा होतेय. कुशल सध्या बालपणीच्या आठवणींमध्ये रमला आहे. त्याने लहानपणीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. कुशलने या पोस्टमध्ये त्याच्या भावांसोबतचे मोकळ्या मैदानातील फोटो शेअर केले आहेत. पण हे मैदान त्याच्यासाठी खास आहे. याबद्दल कुशलने लिहिलंय कि, ‘‘माझ्या जुन्या घराला लागून एक छोटं मैदान आहे, तसं माझं बालपण घरापेक्षा जास्त वेळ या मैदानातच गेलं खरंतर. अगदी भातुकली पासुन कबड्डी, खोखो, क्रिकेट, आबादुबी, लपंडाव , पतंग ते होळी, दिवाळी, दहीहंडी…… पर्यंत सगळ सगळ तिथे अनुभवल.’’
पुढे कुशल म्हणतो कि, ‘‘आज माझ्या मुलाला निबंध म्हणून 10 मार्कासाठी जे जे विषय आहेत ते ते सगळं “माझ” या मोकळ्या मैदानात शिकून आणि जगून झालंय. बालपणी इथल्या “गवताचा वास” आमच्या अंगाखांद्याला चिकटून राहायचा कितीही घासून आंघोळ केली तरी जाता जायचा नाही हा “वास” आता इतक्या वर्षांनी पाहीलं तर “इथल्या गवताला आमच्या बालपणाचा वास येतो”. हेही वाचा - Shilpa Navalkar : अभिनेत्री शिल्पा नवलकर यांचा निर्मात्यावर कथा चोरल्याचा आरोप; नुकतीच झाली होती चित्रपटाची घोषणा कुशलचं बालपण अगदी रम्य आणि छान होतं हे त्याच्या या फोटोवरून समजतंय. ही पोस्ट शेअर करताना कुशल अगदी नाॅस्टॅलजिक झालेला जाणवतो. प्रत्येकासाठीच आपल्या बालपणीच्या आठवणी मौल्यवान असतात. तसंच कुशलचंही आहे. त्याची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांना फारच भावली आहे. त्याचं लिखाणही चाहत्यांना आवडतंय.
या पोस्टवर चाहत्यांनी ‘कॅप्शन खूप भारी’, ‘फार छान लिहिलंयस’ अशा कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. तर प्रसिद्ध लेखक वैभव जोशी यांनी कुशलच्या या पोस्टवर एक कमेंट करत त्याला छान सल्ला दिला आहे. ते म्हणतायत कि, ‘‘तू सातत्याने लिहायला हवंस.’’ कुशलचे कॅप्शन खूपच छान असतात. त्यामुळे त्याचे चाहते नेहमीच त्याच्या पोस्टची वाट पाहताना दिसतात. याचबरोबर त्याचे कॉमेडी व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.