मुंबई, 12 सप्टेंबर : ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता कुशल बद्रिकेचा भावूक झालेला व्हिडिओ समोर आला आहे. आपल्या घराजवळील महामार्गावर होत असलेल्या अपघातांमुळे कुशल बद्रिके हा अस्वस्थ झाला असून त्याने ठाणे महापालिकेकडे कळकळीची विनंती केली आहे. कुशल बद्रिकेने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. कुशल हा ठाण्यातील सूरज वॉटर पार्कसमोर राहतो. घराच्या समोरच असलेल्या महामार्गावर वाघबीळ उड्डाण पुल जिथे संपतो तिथून दुसऱ्या रस्त्यावर जात असताना ठिकाणी अंधार आहे आणि कोणतेही दिशादर्शक फलक नाही. त्यामुळे तिथे वारंवार अपघात होतात, अशी माहिती कुशलने या व्हिडिओतून दिली.
एवढंच नाहीतर कुशलने आपल्या व्हिडिओत एका कंटनेरला अपघात झाल्याचंही दाखवलं आहे. एक कंटनेर हा डिव्हायडरवर जाऊन विजेच्या खांबाला धडकला आहे. त्यामुळेच कुशलने फेसबुकवर व्हिडिओ लाईव्ह करून ठाणे पालिका प्रशासनाला मनापासून विनंती केली आहे. वाघबीळ ब्रिजवर सतत अपघात होत आहे. प्रचंड लोकांचं नुकसान होत आहे. या ठिकाणी काही तरी केलं पाहिजे, जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी विनंती आणि मागणी अभिनेता कुशल बद्रिके याने पालिकेला केली आहे. तसंच,मला कुणालबद्दलही नाराजी व्यक्त करायची नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षावर बोट ठेवायचे नाही. हा माझा कोणताही स्टंट नाही. फक्त दररोज होणाऱ्या या अपघाताच्या घटनेमुळे लोकांचे प्रचंड नुकसान होत आहे. ते कुठे तरी थांबले पाहिजे, या भावनेतून हा व्हिडिओ मी केला आहे, असंही कुशलने या व्हिडिओत सांगितले आहे. कुशलचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी कुशलच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधव यानेही कुशलच्या भूमिकेचं स्वागत केले आहे.

)







