मुंबई, 5 डिसेंबर : झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी श्रेया बुगडे तिच्या विनोदी अंदाजामुळे तर चर्चेत असते. प्रेक्षकांना खळखळून हसवणारी श्रेया सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती अनेक फोटो आणि व्हिडीओंनी चाहत्यांचं लक्ष केंद्रित करत असते. तिचे चाहतेही तिच्या पोस्टवर भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद देत असतात. अशातच श्रेयाचा नवा व्हिडीओ आणि व्हिडीओला दिलेलं हटके कॅप्शन व्हायरल होत आहे. श्रेया बुगडेनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलही पहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये श्रेयाने डान्स करतानाच्या काही फोटोंची क्लिप बनवत हा व्हिडीओ बनवला आहे. ‘गोविंदा नाम मेरा’ सिनेमातील ‘बना शराबी’ या रोमँटिक गाण्यावर विकी आणि श्रेया डान्स करत आहे. सोबत हा व्हिडीओ शेअर करत श्रेयाने लिहिलं, ‘कियारा डुब्लिकेट असली तरी विकी कौशल ओरीजनल आहे.’ श्रेयाच्या या पोस्टवर सध्या चाहत्यांच्या कमेंटचा वर्षाव होत आहे.
‘चला हवा येऊ द्या’ च्या अनेक कलाकार हजेरी लावत असतात. मग ते मराठी कलाकार असो वा हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार. चला हवा येऊ द्या ची टीम प्रत्येक कलाकारासोबत खूप धमाल, मस्ती करताना पहायला मिळतात. अशातच आता या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अभिनेता विकी कौशल त्याचा आगामी चित्रपट ‘गोविंदा नाम मेरा’च्या प्रमोशनच्या निमित्ताने हजेरी लावणार आहे. यावेळी कार्यक्रमातील कलाकार त्यांच्यासोबत मस्ती, मजा करणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे प्रेक्षक पुन्हा एकदा लोटपोट हसण्यासाठी तयार आहेत.
दरम्यान, विकी कौशलसोबत ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 16 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल खूप डान्स करताना दिसणार आहे. चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.