मुंबई, 02 जून : सलमान खान आणि कतरिना कैफ सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सलमानचा 'भारत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामध्ये सलमान एकाच व्यक्तीच्या तरूण वयापासून ते म्हातारपणापर्यंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात सलमानचं नावही भारत असून कतरिना कैफ सलमानच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण या सिनेमासाठी कतरिनानं वरुण धवनचा स्ट्रीट डान्सर हा सिनेमा सोडला होता. नुकत्याच एका मुलाखतीत कतरिना या मागचं खरं कारण सांगितलं.
वरुण धवन आणि श्रद्धा कपूरच्या प्रमुख भूमिका असलेला स्ट्रीट डान्सर श्रद्धाच्या अगोदर कतरिनानं साइन केला होता. मात्र काही दिवसांनतर तिनं हा सिनेमा सोडल्याची माहिती समोर आली. DNA ला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाला याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर कतरिना म्हणाली, 'भारत' आणि 'स्ट्रीट डान्सर' या दोन्ही सिनेमांचं शूटिंग एकाच वेळी सुरु झाल्यानं मी भारतची निवड केली आणि स्ट्रीट डान्सर सोडण्याचा निर्णय घेतला.'
कतरिना पुढे म्हणाली, 'भारत' सिनेमा माझ्यासाठी खूप स्पेशल सिनेमा आहे. अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला पुन्हा मिळणार नव्हती. जर मी दोन्ही सिनेमांमध्ये काम केलं असतं तर मी 'भारत'साठी पुरेसा वेळ देऊ शकणार नव्हते. त्यामुळे मी 'स्ट्रीट डान्सर' सोडण्याचा निर्णय घेतला आणि आता मी माझ्या या निर्णयावर खूप खूश आहे.' कतरिनानं 'स्ट्रीट डान्सर'ला बायबाय केल्यानंतर हा सिनेमा श्रद्धा कपूरला मिळाला.
'भारत' सिनेमा त्याच्या नावामुळे फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर जगातही प्रदर्शनाआधीच लोकप्रिय झाला आहे. नुकताच ट्विटरनंही या सिनेमासाठी एक स्वतंत्र इमोजी सुद्धा दिला आहे. तर या सिनेमासाठी कतरिनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 5 जूनला प्रदर्शित होत असून यात सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.