मुंबई, 19 फेब्रुवारी- कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश (Kannada actor Rajesh) यांचे शनिवारी बेंगळुरू येथे निधन झाले. किडनी, श्वसन आणि वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांना ९ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि नंतर पहाटे अडीच वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते 89 वर्षांचे होते आणि आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 1960 च्या उत्तरार्धात आणि 1970 च्या सुरुवातीस त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. राजेश यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला होता आणि त्यांचे खरे नाव मुनी चौडाप्पा होते. तर त्यांचे रंगभूमीवरील नाव विद्यासागर होते. तरी त्यांना राजेश या नावानेच ओळखलं जात होतं. आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी लहान वयातच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक नाटके केली. त्यांनी शक्ती नाट्य मंडळ नावाने स्वत:चं नाट्य मंडळ स्थापन केलं होतं. ज्यातून त्यांना चांगली ओळख मिळाली. 1964 च्या कन्नड चित्रपट वीरा संकल्पमध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक हुनसुर कृष्णमूर्ती यांनी विद्यासागर यांची ओळख करून दिली. 1968 मध्ये आलेला ‘नम्मा ओरू’ हा चित्रपट राजेश यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. कारण हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. आणि यातून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. 45 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 150 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कला तपस्वी राजेश आत्मचरित्र’ हे त्यांचे आत्मचरित्र 2014 मध्ये प्रकाशित झाले होते. 15 एप्रिल 1932 रोजी बंगळुरू येथे मुनी चौडप्पा म्हणून जन्मलेल्या राजेश यांनी त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांपासून नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी 60 च्या दशकात कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि आपल्या कारकिर्दीत शेकडो चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत. राजेश यांची मुलगी आशा राणी देखील एक चित्रपट निर्माती आहे. आणि तिने अभिनेता अर्जुन सर्जासोबत लग्न केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.