नवी दिल्ली, 26 जानेवारी : कृषी कायद्यांविरोधात (Farm Laws) सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (farmers protest) हिंसक वळण लागलं. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांना दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीची परवानगी मिळाली आणि आंदोलकांनी एकच गलका केला. याचे बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. असाच एक फोटो शेअर करत अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana ranaut) आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि अशा आंदोलनाचं समर्थन करणारा प्रत्येक जण दहशतवादी आहे, असं खळबळजनक वक्तव्य तिनं केलं आहे.
प्रजासत्ताक दिनी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कंगना रणौतनं एक ट्विट केलं आहे. यामध्ये एक आंदोलनकर्ता खांबावर चढून राष्ट्रध्वजाऐवजी भलताच झेंडा फडकवाताना दिसतो आहे. कंगनानं हा फोटो शेअर करताना आपण शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असं सांगत अनेक ब्रँड्सनी आपल्यासोबत करार रद्द केला आहे. या आंदोलनाला समर्थन करणारा प्रत्येक जण दहशतवादी आहे, असं कंगना म्हणाली.
Six brands cancelled contracts with me some were already signed some were closing n said I called Farmer terrorists so they can’t have me as an ambassador. Today I want to say each and every Indian who is supporting these riots is also a terrorist including anti national brands. https://t.co/JVzLO4hqEU
कंगनानं ट्विटमध्ये म्हटलं आहे, "शेतकऱ्यांविरोधात बोलल्यानं 6 ब्रँड्सनी माझ्यासोबतचा करार रद्द केला आहे. मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं त्यामुळे ते मला ब्रँड अॅम्बेसिडर नाही बनवू शकत असं त्यांनी सांगितलं. आज मी प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की जो कुणी या आंदोलनाचं समर्थन करत आहे तोदेखील दहशतवादी आहे. ज्यामध्ये अँटी नॅशनल ब्रँड्सचाही समावेश आहे"
यासोबतच कंगनानं या आंदोलनाला समर्थन देणाऱ्या सेलिब्रिटीजवरदेखील निशाणा साधला आहे. "प्रियंका चोप्रा आणि दिलजीत दोलांझ. आज संपूर्ण जग आपल्यावर हसत आहेत. तुम्हाला हेच हवं होतं ना? अभिनंदन"
कायम रोखठोक बोलणाऱ्या, सडेतोड उत्तरं देणाऱ्या आणि वादग्रस्त विधानं करणाऱ्या कंगनासमोरील अडचणी आता वाढतच चालल्या आहेत. याआधी कंगनाविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल आहेत. एक वांद्रे तर दुसरी जुहू पोलीस ठाण्यात आहे.
कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केलं होतं. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली आहे.
तर जुहू पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तक्रार केली आहे. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जुहू पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत आणि त्यासाठीच आता कंगनाची चौकशी केली जाणार आहे.