मुंबई 13 मार्च: ड्यूक ऑफ ससेक्स अर्थात युवराज हॅरी (Prince Harry) आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेघन मार्कल (Meghan Markle) यांनी आपला मुलगा आर्चीसह (Archie) ब्रिटनच्या राजघराण्यातून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय सध्या जगभर गाजतो आहे. त्यावर दोन्ही बाजूंनी मतं व्यक्त होत आहेत. याच आठवड्यात ओप्रा विन्फ्रेच्या प्रसिद्ध शोमध्ये त्या दोघांची विस्तृत मुलाखतही झाली. त्यावरूनही ऑनलाइन विश्वात बऱ्याच स्फोटक प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर, 'क्वीन ऑफ झाशी'ची भूमिका निभावणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनेही आपलं मतं व्यक्त केलं आहे. तिनं ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) हिच्या पारड्यात आपलं मत टाकलं असून, लोकांनी केवळ एकच बाजू ऐकून, त्यावर गॉसिप करून निर्णय लावला आणि त्या राजघराण्याची ऑनलाइन बदनामी केली, असं भाष्य करणारं ट्विट कंगनानं केलं आहे.
तसंच, 'मला 'सास-बहू' कथानकांत कधीच रस नव्हता. त्यामुळे मी तो इंटरव्ह्यू पाहिला नाही,' अशा शब्दांत तिने टोला हाणला. गेल्या काही दिवसांत लोकांनी केवळ एका व्यक्तीचं बोलणं ऐकून त्यावर अख्खं राजघराणंच जणू पणाला लावलं आहे, याचं आश्चर्य वाटत असल्याचंही तिनं सांगितलं.
अवश्य पाहा - 20 वर्षांपुर्वीची चूक आत्ता आठवली; सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडनं मागितली माफी
"जगात सध्या एकमेव असलेली राज्यकर्ती राणी (Queen) कदाचित चांगली सासू, पत्नी किंवा बहीण बनू शकली नसेल; पण ती महान राणी आहे. तिने कोणत्याही मुलापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने राजपद सांभाळलं आहे. प्रत्येक भूमिका आपल्याला परिपूर्णत्वाने निभावता येत नाही. एखाद्या भूमिकेत जरी आपण सर्वोत्तम कामगिरी केली, तरी पुरेसं आहे" अशा आशयाचं ट्विट करत कंगनानं राणीची बाजू घेतली आहे.
May not be an ideal MIL/wife/sister,but she is a great Queen,she carried forward her father’s dream, saved the crown better than any son could have. We can’t play every role to perfection even if we excel at one should be enough. She saved the crown. Let her retire like a Queen.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 12, 2021
ट्विटसोबत कंगनाने राजघराण्यातील व्यक्तींच्या फोटोंचं कोलाजही पोस्ट केलं आहे. त्यात राणी एलिझाबेथ (द्वितीय), तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला पार्कर, राणीचा नातू प्रिन्स विल्यम (Prince William) आणि त्याची पत्नी केट मिडलटन (Kate Midleton), दुसरा नातू प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांचा समावेश आहे.
यातच कंगनाने महात्मा गांधीजींचं (Mahatma Gandhiji) उदाहरण देऊन लिंगभेदाच्या विषयावरूनही टिप्पणी केली. एका ट्विटर युझरने दिलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देताना कंगनाने लिहिलं आहे, 'महात्मा गांधीजी हे चांगले पालक नव्हते, असा आरोप त्यांच्या मुलांनीच केलेला आहे. तसंच, पाहुण्यांचे संडास साफ करण्यास नकार दिल्यावरून गांधीजींनी त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढल्याच्या नोंदीही सापडतात. ते एक महान नेते होते; पण ते पती म्हणून चांगले नव्हते. असं असलं तरीही, जग पुरुषांच्या बाबतीत क्षमाशील बनतं.'
दरम्यान, ओप्रा विन्फ्रेच्या (Oprah Winfrey) दोन तासांच्या शोमध्ये राजघराण्याची नातसून मेघन मार्कल हिने आपल्या निर्णयाला कारणीभूत ठरलेल्या अनेक गोष्टी उघड केल्या. त्यांचा मुलगा आर्चीच्या वर्णावरून उपस्थित केले जात असलेले प्रश्न, राजघराण्याचं संरक्षण जाणार असल्याचा प्रश्न, तसंच प्रचंड दबाव यांमुळे आत्महत्येचा विचारही मनात आल्याचं तिने सांगितलं. तसंच, राजपदाचे थेट दावेदार असलेले आपले वडील प्रिन्स चार्ल्स आपल्याला प्रोत्साहन देण्यात कसे कमी पडले आणि आपल्याला राजघराण्याच्या सोनेरी पिंजऱ्यात अडकून पडल्यासारखं का वाटत होतं, ते प्रिन्स हॅरीने सांगितलं.
या दाम्पत्याने केलेल्या गंभीर आरोपांनंतर एलिझाबेथ राणीला स्पष्टीकरण देणं भाग पडलं. बकिंगहॅम पॅलेसकडून (Buckingham Palace) जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, की 'हॅरी आणि मेघन यांच्यासाठी गेली काही वर्षं कशी आव्हानात्मक होती, हे ऐकल्यानंतर राजघराण्याला प्रचंड दुःख झालं. खासकरून वंशावरून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे गंभीर आहेत. काही मुद्द्यांवरून मतभेद असू शकतात; मात्र ते गांभीर्याने घेण्यात आले असून, कुटुंबात खासगीरीत्या त्यावर उपाय काढला जाईल. हॅरी, मेघन आणि आर्ची हे कायमच राजघराण्याचे प्रचंड प्रेम असलेले सदस्य राहतील.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Kangana ranaut