मुंबई, 15 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासामध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा खासदार आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी बॉलिवूडवर निशाणा साधला होता. त्यावर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत भडकली आहे. तिने ट्वीट करत बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.
कंगना रणौतने ट्वीट करून जया बच्चन यांना तिखट भाषेत काही सवाल केले आहेत. तिने ट्वीट करून असे म्हटले आहे की, 'जया जी, जर मी तुमची मुलगी श्वेता असते आणि टीनएजमध्ये तिला मारले असते, ड्रग दिले असते आणि तिच्याबरोबर छेडछाड झाली असती, तरी देखील तुम्ही असेच म्हटला असता का? जर अभिषेक सातत्याने गुंडगिरी आणि छळवणूक केल्याबद्दल तक्रार केली असती आणि एक दिवस गळफास घेतलेला आढळला असता तरी देखील तुम्ही असेच म्हटला असता का? आमच्याबद्दलही दया दाखवा'.
Jaya ji would you say the same thing if in my place it was your daughter Shweta beaten, drugged and molested as a teenage, would you say the same thing if Abhieshek complained about bullying and harassment constantly and found hanging one day? Show compassion for us also 🙏 https://t.co/gazngMu2bA
दरम्यान ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली आहे. यानंतर ड्रग कनेक्शन संदर्भातील काही गोष्टी समोर आल्याची शक्यता आहे. याप्रकरणी खासदार आणि अभिनेता रवी किशन यांनी याबाबत चौकशीची मागणी करत बॉलिवूडमधील अंमली पदार्थाच्या व्यसनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
'कुछ लोक जिस थाली में खाते है उसी में छेद करते हैं', असं म्हणत जया बच्चन यांनी रवी किशन यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. सोमवारी रवी किशन यांनी इंडस्ट्रीतील वाढत्या ड्रग कनेक्शनबाबत चिंता व्यक्त केली होती. उत्तर प्रदेशमधील भाजपचे खासदार रवी किशन यांनी सुशांत सिंह राजपूत तपासात फिल्म इंडस्ट्रीवर उद्भवलेल्या ड्रग्ज-संबंधी आरोपाबाबत काही प्रश्न संसदेत उपस्थित केले. पाकिस्तान आणि चीनने देशातील तरूणांना संपुष्टात आणण्यासाठी कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. दोषींवर कारवाई करत परकीय देशाचा कट संपवण्याची मागणी त्यांनी केली होती.
जया बच्चन यांनी ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या होणाऱ्या बदनामीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, 'लोक बॉलिवूडला बदनाम करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही दिवसांपासून बॉलिवूडला बदनाम केले जात आहे. फक्त काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण इंडस्ट्रीवर कलंक ठेवू शकत नाही. मला खरोखर लाज वाटली की काल लोकसभेतील एक सदस्य, जे इंडस्ट्रीत आहेत, त्यांनी फिल्म इंडस्ट्रीविरूद्ध भाषण केले.'