मुंबई, 3 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘मिली’ चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. सनी कौशल आणि मनोज पाहवा यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती खूप व्यस्त आहे. हा चित्रपट ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त जान्हवी कपूर नुकतीच **‘द कपिल शर्मा शो’**मध्ये पोहोचली. यावेळी तिच्यासोबत तिचे वडिल बोनी कपूरही उपस्थित होते. या भागाचा प्रोमो व्हिडीओ समोर आला असून बोनी कपूरने जान्हवीचे काही सिक्रेट्स या शोमध्ये शेअर केलेले पहायला मिळत आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागाचा प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की, बोनी कपूर म्हणाले, मी तिच्या खोलीत जातो तेव्हा सर्व कपडे विखुरलेले असतात. बाथरुममध्ये टूथपेस्ट उघडलेली असते. सुदैवाने, ती कमीतकमी फ्लश तरी करते. बोनी कपूरचं हे बोलणं ऐकून जान्हवी मोठ्याने ओरडते पापा. यामुळे शोमध्ये एकच हशा झालेला पहायला मिळतोय. सोनी वाहिनीवर प्रसारित होणार्या ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागात ही बाप-लेकीची जोडी धमाल करताना दिसणार आहे. या शोमध्ये कपिलचे ऑन-स्क्रीन कुटुंब दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना संगीत श्रद्धांजली वाहताना दिसेल. जान्हवीही कपिलच्या कुटुंबासोबत तिची आई श्रीदेवीच्या ‘हवा हवाई’ गाण्यावर डान्स करताना दिसणार आहे.
जान्हवी कपूरचा चित्रपट ‘मिली’ 4 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांसोबत काम करत आहे. तिचे वडील बोनी कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यामुळे जान्हवीच्या या चित्रपटासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.
दरम्यान, ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शोमध्ये दर आठवड्याला वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावतात. जिथे फुल ऑन धमाल असते आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होते. कपिल शर्माचा नवा सीझन नुकताच सुरू झाला असून कपिलचे चाहते यासाठी खूप आनंदी आणि उत्साही आहेत.