मुंबई, 11 ऑक्टोबर : हर हर महादेव’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला, त्यानंतर सिनेमातील प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांची नावं आणि लुक समोर आले तेव्हापासून प्रेक्षकांना ट्रेलर पाहण्याची उत्सुकता होती. अनेक मराठमोळ्या अभिनेत्री पहिल्यांदा यानिमित्तानं ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहेत. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा शूर मावळा म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे यांची वीर गाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सिनेमातील सगळ्या कलाकारांचे लुक पाहून चित्रपटाचा ट्रेलर पाहण्याचे वेध प्रेक्षकांना लागले होते. शरद केळकरला बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. आता हा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सुबोध भावेने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ‘स्वराज्य उभं राहतं ते कर्तव्याच्या तकलादू भितींवर नाही तर त्यासाठी लागतो इमानाचा काळा दगड!’सादर करत आहोत स्वराज्याच्या निष्ठेची, बलाढ्य शक्तीची, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमांच्या गाथेची झलक….येतोय ‘हर हर महादेव’ 25 ऑक्टोबरपासून मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या 5 भाषांमधून आपल्या भेटीला.’ असा कॅप्शन देत त्याने ट्रेलर शेअर केला आहे. हेही वाचा - Har Har Mahadev : छोटा पडदा गाजवल्यानंतर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता आता साकारणार ऐतिहासिक भूमिका हर हर महादेव या सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेता सुबोध भावे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या सिनेमात असल्याची कालच घोषणा करण्यात आली त्यानंतर आत अभिनेत्री सायली संजीव देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर हार्दिक जोशी आणि शरद पोंक्षे हे अभिनेते महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.
बाजीप्रभू देशपांडेच्या पत्नी सोनाबाई देशपांडेंची भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहेत. तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी ‘महाराणी सईबाई भोसले’ यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीवची वर्णी लागली आहे. हर हर महादेव हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशात प्रदर्शित होणार आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून हा सिनेमाच एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे.