मुंबई, 1 ऑक्टोबर : ‘हर हर महादेव’ या सिनेमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट पहिला बहुभाषिक मराठी सिनेमा असणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसमोर आली आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत कोण असेल याची सर्वांना उत्सुकता होती. अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहेत. तर त्यानंतर आता अजून एका महत्वाच्या व्यक्तिरेखेविषयी माहिती समोर आली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार त्याविषयी माहिती समोर आली आहे. मराठमोळा अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंच्या करारी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या लूकची ही पहिली झलक समोर आली आहे. विविधांगी भूमिका साकारणारा शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. यापूर्वी ‘तान्हाजी’ या हिंदी सिनेमात शरदनं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याने त्याचा बाजीप्रभू देशपांडे यांचा फर्स्ट लूक शेअर करत लिहिलं आहे कि, ‘‘ज्यांच्या युद्धाच्या आव्हानाने आणि शौर्याने शत्रूलाही भुरळ घातली, ज्यांनी आपल्या अंगावर अगणित प्रहार सहन करून आपल्या रक्ताने स्वराज्याचा अभिषेक केला… अशा पराक्रमी, शूर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत झी स्टुडिओज अभिनेते शरद केळकर सादर करत आहेत. या दिवाळीत 25 ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’चा हा शिवकालीन पेहराव मराठी, हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू या 5 भाषांमध्ये भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये घुमणार.’’ हेही वाचा - Shashank ketkar : ‘म्हणून टेलिव्हिजनला कधीच दुय्यम लेखू नये’; शशांक केतकरचा रोष नक्की कोणावर? यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी फारच खास असणार आहे. कारण येत्या 25 ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विविध भाषेत रिलीज होणार हा पहिला मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा लढतीचा चित्तथरारक अनुभव घेता येणार आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून ‘स्वराज्य’ मिळवण्यासाठी शौर्य, त्याग, मैत्री आणि अतूट संयमाची एक वेधक गाथा प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास येणाऱ्या प्रत्येक पिढीला शौर्य-साहस आणि स्वराज्याचं शिक्षण देण्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी फारच खास असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हर हर महादेव’ या युद्धाच्या घोषणेने आणि मराठा साम्राज्याचा पाया रचण्याच्या निष्ठेतून सर्वांना कसं एकत्र केलं हे या कथेतून सांगितलं जाईल.
या बहुभाषिक रिलीजच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. या चित्रपटात मराठीतील अनेक दिग्गज कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.