नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज (11 ऑक्टोबर) आपला 79वा वाढदिवस (Happy Birthday) साजरा करत आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या या टप्प्यावरही ते तंदुरुस्त आहेत. काम करण्याचा त्यांचा उत्साह तर तरुणांना देखील लाजवेल असा आहे. सत्तरी पार पोहचलेले लोक सहसा विश्रांती घेण्याचा विचार करतात. मात्र, अमिताभ बच्चन अजूनही 16 तास काम करतात. त्यामुळेच ते तरुणांसाठी आपल्या समवयीन ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेरणास्रोत बनले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक ब्रँडच्या जाहिरातीदेखील आहेत. प्रत्येक लहान -मोठ्या दिग्दर्शकासोबत ते अतिशय मन लावून आणि शिस्तबद्धपणे काम करतात. जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या फिटनेस (Fitness) आणि आरोग्याची (Health) चर्चा होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो की त्यांच्या फिटनेसचं रहस्य नेमक आहे तरी काय?
मिठाईपासून राहतात दूर -
सामान्य व्यक्ती असो किंवा एखादी सेलिब्रिटी... मिठाई तर प्रत्येकाला आवडते. मात्र, या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट्स आणि कॅलरीज असतात. हे घटक आरोग्यासाठी हानीकारक असतात. म्हणून अमिताभ बच्चन मिठाईपासून स्वत:ला दूरचं ठेवतात. इतकंच नाही तर ते चॉकलेट आणि पेस्ट्रीसुद्धा खात नाहीत.
'नो स्मोकिंग-नो अल्कोहल' -
आपल्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन मनसोक्त सिगारेट ओढताना दिसले आहेत. पण वास्तविक जीवनात ते स्मोकिंग करत नाहीत. स्मोकिंग ही एक वाईट सवय आहे जी शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करते, या मताचे ते आहेत. ते दारुपासून देखील लांब आहेत.
नियमित व्यायाम -
महानायक अमिताभ बच्चन दररोज वर्कआउट करतात. नियमित मॉर्निंग वॉकला जाणं आणि योगासनं करणं हा त्याच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. मानसिक शांती आणि आनंदी व्यक्तिमत्त्वासाठी मेडिटेशन आणि योगासनं करतात. एकूणच नियमित व्यायाम हे त्यांच्या फिटनेसचे सर्वांत मोठं कारण म्हणता येईल.
चहा-कॉफी -
अल्कोहोल आणि सिगारेट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांना चहा आणि कॉफी पिणंदेखील आवडत नाही. तरुणपणात ते कॉफीचे शौकिन होते. मात्र, नंतर त्यांनी कॉफीची सवयदेखील मोडून टाकली. कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन आढळतं आणि सातत्यानं त्याचं सेवन केल्यास ते आरोग्यासाठी हानीकारक ठरतं.
नॉनव्हेज -
कधीकाळी अमिताभ बच्चन नॉनव्हेजचे चाहते होते. ते मनसोक्तपणे नॉनव्हेज खात असत. नंतर मात्र त्यांनी नॉनव्हेज खाणं बंद केलं. त्यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये सांगितलं होतं की, ते आणि त्यांची पत्नी अभिनेत्री जया दोघेही शुद्ध शाकाहारी झाले आहेत. सध्या ते बॉलीवूडमधील सर्वात फिटेस्ट व्हेजिटेरियन (Vegetarian) लोकांपैकी एक आहेत.
असा आहे बिग बींचा डाएट प्लॅन -
अमिताभ आपल्या दैनंदिन आहारात तुळशीची पानं, प्रोबायोटिक पदार्थ आणि प्रोटिन ड्रिंक्स घेतात. नारळाचं पाणी, आवळा रस, केळी, खजूर, शेव हे पदार्थ स्नॅक्स म्हणून खातात. याशिवाय फिट आणि निरोगी राहण्यासाठी ते भरपूर पाणी देखील पितात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amitabh Bachchan, Fitness, Health