मुंबई, 20 मे- ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ हे वाक्य सध्या सतत कानावर पडत आहे. गौतमी पाटील ने लोकांना अक्षरशः वेड लावलं आहे. आपल्या नृत्याच्या जोरावर गौतमी पाटील सध्या तुफान लोकप्रिय झाली आहे. नृत्यांगनेला पाहण्यासाठी गावोगावी लोकांची झुबंड उडत आहे.एकीकडे प्रसिद्धी मिळत असतांना, दुसरीकडे गौतमी वादातदेखील सापडत असते. कधी आपल्या आक्षेपार्ह हावभावांमुळे तर कधी लावणीच्या विचित्र स्टेप्समुळे गौतमीवर टीका होत असते. तिचा कोणताही कार्यक्रम वादाशिवाय पार पडत नाही असं एक समीकरणच बनलं आहे.दरम्यान आता गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं आणखीनच महागात पडणार असल्याचं दिसत आहे. नेमकं काय घडलंय पाहूया. राज्यातील ग्रामीण भागात गेल्या चार-पाच महिन्यात अनेक यात्रा-जत्रा पार पडत आहेत. अशातच करमणुकीच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आवर्जून ठेवला जात आहे. लाखो रुपयांच्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या देऊन गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे.गौतमीला आपल्या गावात बोलावण्यासाठी स्थानिक पुढारी आणि कार्यकर्ते हवा तितका पैसा खर्च करायला तयार असतात. (हे वाचा: Gautami Patil: रुग्णालयाशेजारीच गौतमी पाटीलने धरला ठेका; पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? नव्या वादाला तोंड ) उपस्थित लोक तिच्या अदाकारीला तुफान प्रतिसाद देत असतात. हे सर्व असताना दुसरीकडे मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात सतत तरुणाईचा धुडगुड दिसून येत आहे. गौतमीचा कोणताही कार्यक्रम शांततेत पार पडेल याबाबत थोडी शंकाच आहे. आजपर्यंत झालेल्या तिच्या प्रत्येक कार्यक्रमात काही ना काही गोंधळ झालेला. किंवा राडा होण्याच्या शक्यतेने खबरदारी म्हणून आधीच पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडलेला अनेकवेळा पाहायला मिळालं आहे. आता याच गोष्टीचा परिणाम आयोजकांच्या खिशावर होणार आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कोणताही राडा होऊ नये यासाठी बंदोबस्त म्हणून बोलवण्यात येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना चौपट पैसा द्यावा लागणार आहे. सांगोला याठिकाणी असलेल्या घेरडी या गावात सर्वप्रथम पेड पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांनतर आता हीच पद्धत दुसरीकडे सुरु झाली आहे. मात्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पेड पोलीस बंदोबस्त करणं आयोजकांना चांगलंच महागात पडणार आहे. गौतमी पाटीलच्या सुपारीच्या दुप्पट रक्कम त्यांना द्यावी लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेड पोलीस बंदोबस्तमध्ये 100पोलीस कर्मचारी आणि 6 अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासाठी तब्बल सव्वा ५ लाख रुपयांची रक्कम खर्ची घालावी लागणार आहे. याची झळ थेट आयोजकांच्या खिशाला बसणार आहे. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर याचा परिणाम होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.