मुंबई,13 जानेवारी- मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता चिन्मय मांडलेकर नेहमीच आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. अभिनेता सतत विविध धाटणीच्या भूमिका साकारुन सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. परंतु अभिनेत्याला जशी प्रशंसा मिळते त्याचप्रमाणे त्याला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागतो. आताही असंच काहीसं झालं आहे. अभिनेता लवकरच ‘गांधी -गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशाच काही कमेंट्स पाहून अभिनेत्याची पत्नी भडकली आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. चिन्मय मांडलेकर आपल्या कारकिर्दीत नेहमीच विविध आव्हाने स्वीकारत असतो. तो सतत विविध प्रकारच्या भूमिका साकारुन आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करत असतो. काही दिवसांपूर्वी चिन्मय मांडलेकर ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याने अतिरेक्याची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा करण्यात आली होती. तर काही लोकांनी अभिनेत्याला ट्रोलसुद्धा केलं होतं. अभिनेता सतत आपल्या सोशल मीडियावरुन या सर्वांना परखड उत्तरे देत असतो. परंतु आता चिन्मयची पत्नी नेहा मांडलेकरने नेटकऱ्यांना उत्तर देत एक पोस्ट शेअर केली आहे. **(हे वाचा:** Gandhi Godse – Ek Yudh Trailer Out: गांधी गोडसे ट्रेलर रिलीज; चिन्मय मांडलेकरांचे दमदार डॉयलॉग एकदा ऐकाच ) अभिनेता चिन्मय मांडलेकर लवकरच ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाला आहे. त्यांनतर सोशल मीडियावर चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोक चिन्मयला पाठिंबा देत आहेत. तर काही लोक अभिनेत्यावर सडकून टीका करत आहेत. दरम्यान चिन्मयच्या मुलाचं नाव जहांगीर असल्यामुळे त्यालासुद्धा यामध्ये ट्रोल केलं जात आहे.
नेहा मांडलेकर पोस्ट- प्रिय ट्रोलर्स, ह्याचा आता कंटाळा आला.. ‘९ वर्षांच्या मुलाला’ किती काळ लक्ष्य केलं जाणार आहे? प्रत्येक वेळी त्याच्या वडिलांचा नवीन चित्रपट रिलीज होत असताना तुम्ही त्याला ट्रोल करता. जहांगीर रतनजी दादाभाय टाटा हे देशद्रोही नव्हते… या देशासाठी या महापुरुषाने जे काही साध्य केले ते अनेकांना लाभलं आहे.. आमच्या मुलाचं नाव त्यांच्या नावावर आहे.. आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे.. पण हे सर्व मी कोणाला सांगतेय? त्यांना हे आधीच माहित नाही का.. द्वेषाने आंधळे झालेले लोक ते बाहेर काढण्यासाठी काहीही कारण शोधत असतात. संस्कार.. संस्कृती..नेमक काय असतात??
अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्टं’ म्हणून करणारे संस्कार असतात!! त्याच्या .. आईबद्दल वाट्टेल ते असभ्य बोलणं म्हणजे संस्कृती जपणं ???? आम्ही माणुसकी..प्रेम जपणारी माणसं आहोत .. माझे संगोपन आणि मूल्ये अशा चेहर्याविरहित हल्ल्यांचा निषेध करतात आणि आता मला हे सहन करण्यास मनाई करतात..’ अशा शब्दांत नेहाने आपलं मत व्यक्त केलं आहे.